दक्षिण आफ्रिकेत अपघातात 11 ठार
मिनीबस-ट्रक यांच्यात भीषण धडक
वृत्तसंस्था/केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेतील एका भीषण रस्ते अपघाताने पुन्हा एकदा अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. गुरुवारी पूर्व क्वाझुलु-नताल प्रांतात एका मिनीबस आणि अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत किमान 11 जण जागीच ठार झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण प्रदेश हादरून गेला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आणखी एका भीषण रस्ते अपघातातून देश अद्याप सावरलेला नसताना ही दुर्घटना घडली आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या अपघातात 14 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे दक्षिण आफ्रिकेतील रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
क्वाझुलु-नताल प्रांतातील एका वर्दळीच्या रस्त्यावर गुरुवारी रस्ते अपघात झाला. वाहनांची टक्कर इतकी भीषण होती की मिनीबस आणि टॅक्सीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. प्राथमिक माहितीनुसार अपघातात किमान 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा समावेश आहे. अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. टक्कर झाल्यानंतर मिनीबस टॅक्सीचा चालक वाहनामध्ये अडकला होता. बचावकर्त्यांना त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.