मोरेवाडी, कणेरीवाडीतील 11 हातभट्ट्या उद्ध्वस्त
कोल्हापूर :
राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 व गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 अशा एकूण 11 गावठी दारु तयार करणाऱ्या हातभट्टींवर गुरूवारी सकाळी कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाकडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण 3 लाख 37 हजार 160 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी अवैद्य व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कंजारभाट वस्ती, मोरेवाडी व साईनगर कंजारभाट वस्ती कणेरीवाडी येथे पहाटे गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. गुरूवारी पहाटे निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेच्या हद्दीत 4 अशा एकूण 11 गावठी दारु तयार करणा-या हातभट्टीवर कारवाई केली. यावेळी दारु तयार करण्यासाठी वापरत असणारे 5 हजार 600 लिटर कच्चे रसायन, 1 हजार 540 लिटर पक्के रसायन, 592 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व इतर साहित्य असा एकूण 3 लाख 37 हजार 160 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नष्ट केला. याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात 7 व गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई निरीक्षक रविंद्र कळमकर, सहायक निरीक्षक चेतन मसुटगे, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अमंलदार संजय पडवळ, युवराज पाटील, संजय हुंबे, वसंत पिंगळे, अमित मदाने, दिपक घोरपडे, अमित सजे, संजय कुंभार, यशवंत कुंभार, हंबीरराव अतिग्रे, सागर माने, विजय इंगळे, विशाल खराडे, प्रविण पाटील, शिवानंद मठपती, महिला अमंलदार प्रज्ञा पाटील व तृप्ती सोरटे यांनी केली.