11 कोटींची नाणी गहाळ; सीबीआयचे छापासत्र
राजस्थानसह अन्य शहरात 25 ठिकाणी कारवाई
नवी दिल्ली, जयपूर / वृत्तसंस्था
स्टेट बँक ऑफ इंडियामधून 11 कोटींची नाणी गहाळ झाल्याप्रकरणी मोठी कारवाई करत सीबीआयने गुरुवारी 25 ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने या प्रकरणाच्या चालू असलेल्या तपासात दिल्ली, जयपूर, दौसा, करौली, सवाई माधोपूर, अलवर, उदयपूर आदी शहरांमध्ये 25 ठिकाणी कारवाई केली. या छाप्यांमध्ये शाखा व्यवस्थापक/संयुक्त कस्टोडियन, कॅश ऑफिसर यांच्यासह सुमारे 15 तत्कालीन बँक कर्मचारी आणि इतरांची चौकशी करत तपास केला. यावेळी झडतीदरम्यान सापडलेल्या संशयास्पद कागदपत्रांची छाननी केली जात आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये करौली जिल्हय़ातील स्टेट बँक ऑफ इंडिया, मेहंदीपूर बालाजी शाखेमध्ये नाण्यांच्या मोजणीदरम्यान 11 कोटी रुपयांची नाणी गहाळ झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर बँक अधिकाऱयांकरवी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 13 एप्रिल 2022 रोजी सीबीआयने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्वतंत्र गुन्हा दाखल करत तपास हाती घेतला होता.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेहंदीपूर शाखेत नाण्यांची मोजणी सुरू असताना 11 कोटी रुपयांची नाणी गायब झाल्याचे निदर्शनास आले होते. नाण्यांची मोजणी करण्याचे काम अर्पित गुड्स कॅरिअरकडे सोपविण्यात आले होते. बँकेचे शाखा व्यवस्थापक हरगोविंद मीणा यांच्या देखरेखीखाली ही मोजणी सुरू होती. यानंतर हे प्रकरण पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर तपासात फारसे काही निष्पन्न न झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.