For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुण्यातील आंबेगाव पठारमध्ये ८ अल्पवयीन मुलांना मारहाणीचा आरोप; ११ पोलिसांविरोधात गुन्हा

03:32 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुण्यातील आंबेगाव पठारमध्ये ८ अल्पवयीन मुलांना मारहाणीचा आरोप  ११ पोलिसांविरोधात गुन्हा
Advertisement

पुणे : आंबेगाव पठार पोलीस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून त्यांच्यावर मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, २० आणि २१ जुलै २०२६ रोजी चार-चार अल्पवयीन मुलांना आंबेगाव पठार पोलीस चौकीत आणण्यात आले होते. त्यांना नियमबाह्य पद्धतीने ताब्यात ठेवून बेल्टने मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर न करता पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने फॅक्ट फाईंडिंग अहवालाच्या आधारे कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात अल्पवयीन मुलांशी क्रूर वर्तन, बेकायदेशीर ताबा, मारहाण तसेच पुरावे दडपण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Advertisement

यातील काही अल्पवयीन मुले अनुसूचित जातीतील असल्याने त्यांच्याशी जातीवाचक शिवीगाळ आणि सार्वजनिक अपमान केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह गणेश मोहिते, स्नेहल थोरात, निलेश मोकाशी आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मानवाधिकार आयोगाच्या निर्देशांनंतर ही कारवाई झाली असून, पुढील तपास सीआयडीचे अधिकारी सुनील रामनंद करत आहेत.

Advertisement
Tags :

.