दोन खटल्यांतून 11 कार्यकर्ते निर्दोष
छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अवमान प्रकरणाचा निकाल
बेळगाव : बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला होता. त्यानंतर येथील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी व हिंदू कार्यकर्त्यांनी त्या घटनेचा निषेध नोंदविला. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी वेगवेगळे पाच गुन्हे दाखल केले होते. यामधील दोन खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली असून 11 कार्यकर्त्यांची तिसरे जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याचबरोबर कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एक आणि मार्केट पोलीस स्थानकामध्ये एक गुन्हा दाखल असून त्यांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.
धर्मवीर संभाजी चौक येथे दि. 17 डिसेंबर 2021 रोजी निषेध नोंदविला होता. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, भारत मेणसे, नरेश निलजकर, अंकुश केसरकर, लोकनाथ रजपूत, हरीष मुतगेकर, विनायक कंग्राळकर, मदन बामणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटला क्र. 33 व 34 या दोन खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली.
या खटल्यांमध्ये साक्षी, पुरावे तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांतील विसंगतीमुळे आणि सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता न आल्याने या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. प्रताप यादव, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. रिचमॅन रिकी, ॲड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.