For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावीची परीक्षा सोमवारपासून

10:42 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहावीची परीक्षा सोमवारपासून
Advertisement

शिक्षण विभागाकडून तयारी पूर्ण : भरारी पथकाची नियुक्ती

Advertisement

बेळगाव : दहावीची परीक्षा सोमवार दि. 25 मार्चपासून घेतली जाणार आहे. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 35 हजार 118 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने सर्व तयारी केली असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. याबरोबरच पर्यवेक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या असून, कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात येणार आहे. राज्यात 1 मार्चपासून बारावीची परीक्षा घेण्यात येत होती. शुक्रवार दि. 22 रोजी बारावीच्या परीक्षा संपताच अवघ्या दोनच दिवसात दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली असून, दहावी परीक्षेवेळी कॉपीचे कोणतेही प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पंधरा दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राचे वितरण शाळांकडून करण्यात आले आहे. शनिवार दि. 23 रोजी परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक घातले जाणार आहेत. त्यापूर्वी शुक्रवारी सायंकाळी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पर्यवेक्षकांची यादी देण्यात आली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा गुणवत्तेचा आकडा दरवर्षी घसरत असल्याने यावर्षी निकाल वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून अतिरिक्त वर्ग भरवून त्यांचा अभ्यास घेतला जात होता. त्यामुळे यावर्षी दहावीचा निकाल वाढण्याची शक्यता आहे.

प्राथमिक शिक्षकांवर पर्यवेक्षकपदाची जबाबदारी

Advertisement

विनाअनुदानित शाळा शिक्षकांवर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे पर्यवेक्षक म्हणून कामातून त्यांना वगळण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर अनुदानित शाळांचे शिक्षक नेमण्यात आले आहेत. तरीदेखील बेळगाव शहरामध्ये पर्यवेक्षकाच्या अनेक जागा शिल्लक राहिल्याने त्याजागी 50 ते 60 प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दहावी परीक्षेसाठी पर्यवेक्षकपदाची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांवर देण्यात आली आहे.

  • विभाग    विद्यार्थी संख्या
  • बेळगाव शहर       8535
  • बेळगाव ग्रामीण    5732
  • खानापूर 3876
  • रिपीटर्स 6218
Advertisement
Tags :

.