दहावीची परीक्षा सुरू
32 केंद्रे, 18871 विद्यार्थी, पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी/ पणजी
गोवा शालांत मंडळाची दहावीची परीक्षा काल शनिवार दि. 1 मार्चपासून प्रारंभ झाली. 9574 मुली व 9297 मुले मिळून एकूण 18,871 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. दि. 21 मार्च रोजी शेवटचा पेपर होऊन परीक्षा संपणार आहे.
एकूण 32 केंद्रांतून ही परीक्षा घेण्यात येत असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पाच हजारांपेक्षा जास्त मनुष्यबळ कार्यरत करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान कॉपी आदी गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रामागे दोन भरारी पथके तयार ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय सुरक्षा व्यवस्था म्हणून प्रत्येक केंद्रावर दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मार्च 2024 मध्ये एकूण 18914 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदाही जवळपास तेवढेच परीक्षार्थी आहेत. त्याशिवाय यंदा ‘गुणवाढ’ योजनेच्या माध्यमातून गतवर्षी कमी गुण मिळालेल्या दिडशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याद्वारे त्यांना अधिक गुणांची कमाई करता येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.