कॅन्टोन्मेंटमध्ये 1 हजार 90 अनधिकृत बांधकामे
कारवाईसाठी कॅन्टोन्मेंटची तयारी : बोर्ड मिटिंगकडे नागरिकांचे लक्ष
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. एकूण 1090 अनधिकृत बांधकामे असून ती पाडविण्यासंदर्भात शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. यामुळे कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांचे धाबे दणाणले असून बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कॅन्टोन्मेंटमध्ये काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कॅन्टोन्मेंटने सविस्तर अहवाल तयार केला आहे. एकूण 1090 अनधिकृत बांधकामे असून त्यांच्यावर कॅन्टोन्मेंट अॅक्ट 1994 व 2006 अंतर्गत त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 71 बांधकामांबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्याने उर्वरित 1029 बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून कॅन्टोन्मेंटमधील अनधिकृत बांधकामांचा विषय गाजत आहे. काही शाळांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कॅम्प, किल्ला तसेच इतर भागात ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहे, त्याची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कारवाईबाबतचा अंतिम निर्णय उद्या होण्याची शक्यता
शुक्रवार दि. 6 रोजी बोर्ड मिटिंग होणार असून त्यामध्ये कारवाईबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु या कारवाईमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे या निर्णयानंतर त्याचे काय पडसाद उमटतात हे देखील पाहावे लागणार आहे.
