गोव्यातील 108 गावे जैवसंवेदनशील
जैवसंवेदनशील क्षेत्रासाठी नव्याने अधिसूचना जारी
प्रतिनिधी
पणजी
जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पट्टा असलेल्या पश्चिम घाटातील जैवसंवेदनशील क्षेत्रासंदर्भात केंद्र सरकारने नवी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेच्या कक्षेत गोव्यातील पाच तालुक्यांतील 108 गावांचा समावेश करण्यात आला असून हे प्रस्तावित क्षेत्रफळ सुमारे 1,461 चौरस किलोमीटर असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय राजपत्रात सदर अधिसूचना प्रकाशित झाली आहे.
वरील क्षेत्र ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील’ म्हणून अधिसूचित करण्याचा प्रस्ताव असलेल्या सदर अधिसूचनेवर सध्या संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिक, संस्था व अन्य संबंधित घटकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.
अधिसूचनेला अंतिम स्वऊप मिळाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील पर्यावरण आणि जैवविविधता संरक्षणाच्या दृष्टीने विविध निर्बंध आणि नियम लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
असे असले तरी, 31 जुलै 2024 रोजी जारी करण्यात आलेली 6वी मसुदा अधिसूचना आणि विद्यमान 7व्या मसुदा अधिसूचनेतील प्रस्तावित क्षेत्र तसेच गावांची संख्या यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सदर प्रस्तावित क्षेत्रात समिविष्ट पाच तालुक्यांमध्ये सत्तरी (63), सांगे (26), धारबांदोडा (13), काणकोण (5) आणि फोंडा (1) अशा 108 गावांचा समावेश आहे.
स्थानिकांचे विस्थापन होणार नाही
- या अधिसूचनेमुळे स्थानिक नागरिकांचे विस्थापन होणार नाही.
- शेती, बागायती, मालमत्ता यांच्या हक्कांवरही परिणाम होणार नाही
- घरांची दुऊस्ती, नूतनीकरण किंवा विस्तारासाठी परवानगी असेल.
- जमिनीचा वापर बदलण्यासाठी ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागणार आहे.
- वीज प्रकल्पांसाठी पर्यावरणीय अभ्यासानंतरच परवानगी देण्यात येईल.
अधिसूचनेत समाविष्ट असलेली गावे
काणकोण तालुका
खोल, खोतीगाव, गावडोंगरी, लोलये
धारबांदोडा तालुका
अलगोटे, कामरकोंड, करंजाळ, कुळे, धारबांदोंडा, म्हैसाळ, मोले, पिळये, साकोर्डे, सांगोळ, शिगांव, सोनावली, सुर्ला.
सांगे तालुका
भाटी, भोम, काले, कोळंब, कुमारी, कुर्डी, डोंगर, दोंगुर्ली, दुधाळ, मावळिंगे, नायकिणी, नेत्रावळी, नंद्रे, ओशेल, पाटये, पोरती, पोतरे, साळावली, शिंगणे, तुडव, उगे, वेरले, विचुंद्रे, विलियण.
सत्तरी तालुका
अंजुणे, केरी, आंबेडे, आंबेली, अन्सोळे, असोडे, भिरोंडे, बोबेंडे, भुईपाल-ब्रम्हकरमळी, करमळी बुद्रुक, करंझोळ, चरावणे, कोदाळ, खोडये कडवळ, कोपार्डे, कणकिरे, खोतोडे, कुडसे, कुंभारखण, दाबे, धावे, देरोडे डोंगुर्ली, हेदोडे, गोळावली, हिवरे बुद्रुक, हिवरे खुर्द, माळोली, मालपण, म्हाऊस मेळावली, नगरगाव, नागवे, नानेली, नानोडे पाली, पेंड्रार, पणशे पणसुली खोतोडे, रिवे, सांवर्डे, सतोडे, साटरे, शिंगणे, सुरंगुली, शिरोली, शिरसोडा सोनुस, सुरला, उस्ते, वायगिणी वेळगे, वेळूस, शेळके बुद्रुक, झर्मे.