108 किलो सोने केरळमध्ये जप्त
जीएसटी अधिकाऱ्यांचा छापा : आभूषण विक्री केंद्रांवर कारवाई
वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
केरळ राज्याच्या थ्रिसूर जिल्ह्यात एका आभूषण विक्री केंद्रांवर धाड टाकून जीएसटीच्या गुप्तचर यंत्रणेने 108 किलो बेहिशेबी सोने जप्त केले आहे. ही धाड शुक्रवारी टाकण्यात आली. या केंद्रात हा सोन्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाडीची योजना बनविण्यात आली आणि त्वरित तिचे क्रियान्वयन करण्यात आले, अशी माहिती जीएसटी यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
या धाडीत जीएसटीच्या अनेक अधिकाऱ्यांनी भाग घेतला. या सर्वांना राज्याच्या विविध भागांमधून थ्रिसूर येथे या कामासाठी आणण्यात आले होते. हे अभियान गुप्त ठेवण्यासाठी या अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांच्या वेषात सहलीच्या निमित्ताने आणले गेले होते. केरळमध्ये अशी घटना प्रथमच घडल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदर, तीन केंद्रांवर धाडी टाकण्यात आल्या अशी माहिती राज्याच्या जीएसटी प्रमुखांनी दिली. या केंद्रांच्या मालकाला अटक करण्यात आली असून त्याने हा बेहिशेबी सोन्याचा साठा असल्याची कबुली दिली आहे. त्याची आणखी सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशीही माहिती देण्यात आली.
कमांडो शैलीत धाड
प्रशिक्षित कमांडो ज्याप्रकारे त्वरित हालचाली करुन शत्रूला सुगावाही लागू न देता कारवाई करतात, तशा प्रकारे ही धाड टाकण्यात आली. आधी निश्चित स्वरुपाची माहिती मिळविण्यात आली होती. ही माहिती हाती लागल्यानंतर धाडीची योजना तयार करण्यात आली. या योजनेची माहिती केवळ 5 ते 6 वरीष्ठ अधिकाऱ्यांनाच होती. त्यांच्या नेतृत्वात हे अभियान पार पाडण्यात आले. धाड पडल्याचे लक्षात येताच या केंद्रांमधील काही कर्मचाऱ्यांनी सोन्यासह पळ काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, केंद्रांच्या बाहेरही अधिकारी गस्त घालत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी केंद्रांच्या मालकासह 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुवर्ण आभूषणांचे केंद्र
केरळमधील थ्रिसूर हे शहर सुवर्णआभूषणांचे केंद्र मानले जाते. येथे सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात घडविले जातात आणि ते देशभरात पाठविले जातात. सुवर्णआभूषणे बनविणाऱ्या आणि त्यांची केरळमध्ये, तसेच अन्यत्र विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या आणि पेढ्या या शहरात आहेत, अशी माहिती देण्यात आली. या शहरात बेहिशेबी सोन्याची आयातही मोठ्या प्रमाणात होते. वस्तू-सेवा कर चुकवून येथे मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी-विक्री केली जाते अशी माहिती मिळाल्याने जीएसटीच्या गुप्तचर यंत्रणेने या शहरातील सुवर्णकेंद्रांवर लक्ष ठेवले होते.