पणजी ‘स्मार्ट सिटी’ कामाला आतापर्यंत 1051 कोटी मंजूर
राज्य सरकारला मिळाले 441 कोटी, खर्च झाला 411 कोटी
पणजी : राज्यात स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पणजी स्मार्ट सिटी कामांसाठी 51 प्रकल्पांसाठी तब्बल 1051 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत. त्यापैकी 849 कोटी रुपयांचे 42 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 202 कोटींच्या 9 प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. विविध राज्य सरकार व केंद्र शासित प्रदेशांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री तोखान साहू यांनी राज्यसभेत दिली.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत स्मार्ट सिटीच्या कामाबाबत लेखी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री तोखान साहू यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडने केंद्र सरकारकडून आतापर्यंत 441 कोटी रुपये मिळवले आहेत. यातील 411 कोटी रुपये खर्च झाले आहेत. ही आकडेवारी 4 मार्च 2025 पर्यंतची आहे.
पणजी स्मार्ट सिटीने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पांच्या अंमलबजावणीत विविध विभागांकडून मंजुरी मिळण्यास होणारा विलंब, भूसंपादन, भूजल समस्या, हंगामी पाऊस, संसाधनांच्या उपलब्धता बांधकाम साहित्याची खरेदी अशा अनेक अडचणी होत्या. म्हणूनअतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे, तीन शिफ्टमध्ये काम करणे, संबंधित विभागाकडून बारकाईने देखरेख करणे, कामे जलद करण्यासाठी विविध पावले उचलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.