विभागातील 19 बसस्थानकात 105 सीसीटीव्ही
कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या घटनेनंतर राज्यातील सर्वच बसस्थानकातील सुरक्षा आणि सीसीटीव्हीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील सर्व 23 बसस्थानकांचे सुरक्षा व दक्षता विभागाकडून ऑडिट करण्यात आले. एकूण 23 बसस्थानकांपैकी 19 बसस्थानकात 105 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तर चार बसस्थानकात कॅमेरेच नाहीत. संभाजीनगर बसस्थानकाचे नूतनीकरण झाले आहे. मात्र अद्याप उद्घाटन झाले नाही. यामुळे याठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले नाहीत.
स्वारगेट घटनेमुळे राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सर्वच आगारांतील सुरक्षेचा आढावा घेत महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना एसटी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यांच्या आदेशानंतर एसटी प्रशासन कामाला लागले आहे.
परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागात 23 बसस्थानके आहेत. सुरक्षा व दक्षता विभागाने गेल्या तीन दिवसात या 23 बसस्थानकांचे ऑडिट केले. प्रत्येक बसस्थानकातील दैनंदिन प्रवासी संख्या, दिवसातील बसेसच्या फेऱ्या, रात्र मुक्कामाच्या बसेस, सुरक्षारक्षकांची संख्या, पोलीस चौकी आहे का आणि चौकीत पोलीस असतात का?, सीसीटीव्हीची संख्या, स्थानक प्रमुखांचे कार्यालय कुठे आहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था आहे का या बाबींची पाहणी केली. यामध्ये कोडोली, वाठार, रंकाळा आणि संभाजीनगर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे निदर्शनास आले आहे. संभाजीनगर बसस्थानकाचे नूतनीकरण केले असून त्याला पूर्णत्वाचा दाखला अद्याप मिळाला नाही. बसस्थानक सुरु झाल्यावर सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रस्तावित आहे. तसेच ज्या बसस्थानकात अतिरिक्त कॅमेऱ्यांची गरज भासणार आहे त्याप्रमाणे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडे मागणी करण्य्तात आली आहे.
- एकाही चौकीत पोलीस नसतात
सुरक्षा व दक्षता विभागाने केलेल्या पाहणीत बसस्थानकात पोलीस चौक्या आहेत. पण कोणत्याही बसस्थानकात 24 तास पोलीस नसल्याचे चित्र आहे.
- मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवाल सादर
विभागातील बसस्थानकांचे ऑडिट केले आहे. बसस्थानकावर पोलीस कर्मचारी, पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. तसेच बसस्थानकावर सौर ऊर्जेची मागणी केली आहे. हा अहवाल मुंबई येथील मुख्यालयातील मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना सादर केला आहे.
भानुदास मदने-सुरक्षा व दक्षता अधिकारी
- जिह्यातील बसस्थानके आणि सीसीटीव्हींची संख्या
कोल्हापूर (22), जोतिबा (4), कोडोली (नाही), वाठार (नाही), संभाजीनगर (नूतनीकरणाचे काम), रंकाळा (नाही), इचलकरंजी (6), हातकणंगले (4), वडगाव (4), कुरुंदवाड (3), नृसिंहवाडी (4), शिरोळ (3), जयसिंगपूर (5), कागल (5), हुपरी (4), मलकापूर (8), गारगोटी (7), मूरगूड (4), राधानगरी (3), गगनबावडा (7), चंदगड (4), गडहिंग्लज (12). एकूण 105 सीसीटीव्हे कार्यरत आहेत.