बेंगळुरात 105 बांगलादेशी नागरिक ताब्यात
बेकायदा वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांविरोधात पोलिसांची कारवाई
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
बेंगळुरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांविरोधात रविवारी बेंगळूर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. दरम्यान, पोलिसांनी 105 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. व्हाईटफिल्ड आणि इलेक्ट्रॉनिक सिटी विभागात ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 2,944 संशयितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी 592 पोलिसांचा समावेश असलेल्या 58 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.
व्हाईटफिल्ड विभागात 35 पथकांनी 1,035 जणांची तपासणी केली. त्यातून 62 बेकायदा बांगलादेशी नागरिक आढळले. इलेक्ट्रॉनिक सिटी विभागात 23 पथकांनी 1,909 जणांची तपासणी केली असून 43 जण आढळले. ताब्यात घेतलेल्या नागरिकांची माहिती आणि संबंधित अहवाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी विदेशी नागरिकांच्या प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे (एफआरआरओ) पाठविण्यात आला आहे. तेथून मिळणाऱ्या माहितीनुसार पुढील कारवाई आणि हद्दपारीची प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.