जगभरातील तुरुंगांमध्ये 10,152 भारतीय कैद
3 वर्षांमध्ये केवळ 8 कैद्यांचे अन्य देशांकडून भारताला हस्तांतरण : संसदीय समितीच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
संसदीय समितीच्या एका अहवालानुसार सद्यकाळात जगभरातील विदेशी तुरुंगांमध्ये एकूण 10 हजार 152 भारतीय नागरिक कैद आहेत. यातील अनेक कैद्यांच्या खटल्यांची सुनावणी सुरू आहे. तर अनेक जण शिक्षा भोगत आहेत. अशा कैद्यांच्या प्रत्यार्पणावरून भारताने आतापर्यंत 31 देशांसोबत द्विपक्षीय करार केले आहेत. याच्या अंतर्गत विदेशी तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारतीयांना भारतात आणून त्यांना स्वत:ची उर्वरित शिक्षा पूर्ण करण्याची अनुमती मिळते. परंतु मागील तीन वर्षांमध्ये केवळ 8 कैद्यांनाच विदेशी तुरुंगातून भारतात हलविण्यात आले आहे. ट्रान्सफर ऑफ सेंटेस्टड पर्सन म्हणजेच टीएसपी अॅग्रीमेंटच्या अंतर्गत 2023 मध्ये 5 जणांना भारतात आणले गेले, यातील तीन जण इराण, एक कंबोडिया आणि एक ब्रिटनच्या तुरुंगात कैद होता. तर 2024 मध्ये दोन भारतीयांना ब्रिटनमधून तर एका भारतीयाला रशियातून मायदेशी आणले गेले आहे.
कक्षेत युरोप-अमेरिकेचे बहुतांश देश
भारताने या द्विपक्षीय करारांसोबत दोन आंतरराष्ट्रीय करारांवरही स्वाक्षरी केली आहे. इंटर अमेरिकन कन्व्हेंशन ऑन सर्व्हिंग क्रिमिनल सेंटेंस आणि कौन्सिल ऑफ युरोप कन्व्हेंशन ऑन ट्रान्सफर ऑफ सेंटेंस्ड पर्सन्स या करारात भारत सामील आहे. याच्या अंतर्गत युरोप आणि अमेरिकेचे बहुतांश देश येतात, परंतु आशिया, आफ्रिका आणि पूर्व युरोपच्या अनेक देशांसोबत अद्याप अशाप्रकारचा करार होऊ शकलेला नाही.
समितीकडून शिफारस
संबंधित करारांना लागू करणारी नोडल एजेन्सी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालय कार्यरत आहे, हस्तांतरणाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत आवश्यक दस्तऐवज आणि अनुमती मिळविण्याचे काम गृह मंत्रालयाकडून पूर्ण केले जाते. विदेश आणि गृह मंत्रालयाने मिळून संबंधित देशांसोबत लवकर करार करावेत किंवा जुन्या करारांमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून अधिक भारतीय कैद्यांचे हस्तांतरण होऊ शकेल, अशी शिफारस समितीने केली आहे.
अनेक देशांसोबत द्विपक्षीय करार
ऑस्ट्रेलिया, बहारीन, बांगलादेश, बोस्निया, ब्राझील, कंबोडिया, इजिप्त, इस्टोनिया, फ्रान्स, हाँगकाँग, इराण, इस्राइल, इटली, कजाकिस्तान, कोरिया, कुवैत, मालदीव, मंगोलिया, कतार, रशिया, सौदी, सोमालिया, स्पेन, श्रीलंका, थायलंड, तुर्किये, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि व्हिएतनाम या देशांसोबत भारताने कैद्यांच्या हस्तांतरणासंबंधी करार केला आहे.
12 देशांमध्ये प्रत्येकी 100 हून अधिक कैदी
12 देशांमध्ये प्रत्येकी 100 हून अधिक भारतीय नागरिक तेथील तुरुंगात कैद आहेत. यात सौदी अरेबिया (2647), नेपाळ (1187), मलेशिया (371) आणि बहारीन (272) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या 12 पैकी 9 देशांसोबत ट्रान्सफर संबंधी करार अस्तित्वात आहे. तरीही या देशांकडून कैद्यांची अदलाबदली का होत नाही, अशी विचारणा संसदीय समितीने केली होती. याच्या उत्तरादाखल विदेश मंत्रालयाने भारतीय दूतावास सातत्याने संबंधित देश आणि भारताच्या गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचे सांगितले