सतीश धवन सेंटर येथून 100 वे प्रक्षेपण
देशभरातील नेव्हिगेशन क्षमता वाढणार
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारताची जगद्विख्यात अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने आपले 100 वे प्रक्षेपण करत ‘शतकोत्सव’ साजरा केला आहे. या ‘शतकी’ प्रक्षेपणाच्या माध्यमातून 2 हजार 250 किलोग्रॅम वजनाचा एनव्हीएस-02 हा संचार उपग्रह अवकाशात प्रस्थापित करण्यात आला. या उपग्रहाचे अवकाश आयुष्यमान 12 वर्षे इतके असेल. या उपग्रहाचा उपयोग दूरसंचार आणि इतर महत्त्वाच्या सुविधांसाठी होणार आहे. या यशस्वी उ•ाणाबद्दल आणि ‘शतकी’ कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून बुधवार, 29 जानेवारी रोजी सकाळी 6:23 वाजता जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँचिंग व्हेईकलने उ•ाण केले. हे इस्रोचे 100 वे प्रक्षेपण अभियान ठरले. एनव्हीएस-02 या नावाचा हा उपग्रह इस्रोच्या नव्या पिढीतील उपग्रहांपैकी दुसरा आहे. त्याची निर्मिती पूर्णत: स्वदेशी आहे. या उपग्रहाची तरंगक्षमता एल 1 श्रेणीतील असून ही श्रेणी अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग व्यवस्थेत उपयोगात आणली जाते. जीएसएलव्ही-एफ15 वाहनावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. अवघ्या 19 मिनिटांमध्ये हा उपग्रह अवकाशात 36 हजार 577 किलोमीटर अंतरावरील कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. या उपग्रहात अत्याधुनिक सेन्सर्स आणि अन्य उपकरणे बसविण्यात आली आहेत.
एनव्हीएस-02 हा उपग्रह भारतात जीपीएससारख्या नेव्हिगेशन सुविधा वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला आहे. ही प्रणाली काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते अरुणाचल प्रदेशापर्यंतचा परिसर व्यापेल. याशिवाय, किनारपट्टीपासून 1,500 किमी अंतर देखील पार केले जाईल. यामुळे हवाई, समुद्री आणि रस्ते प्रवासासाठी चांगली नेव्हिगेशन मदत मिळेल. उपग्रहाचा वापर भूमीय, हवाई आणि सागरी नेव्हिगेशन, अचूक कृषी, मोबाईल उपकरणांमध्ये लोकेशन आधारित सेवा, उपग्रहांसाठी कक्षा निश्चिती, इंटरनेट- ऑफ-थिंग्स आधारित प्रयोग, आपत्कालीन सेवा प्रदान करण्यासाठी केला जाणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. इस्रोनुसार ‘नाविक’ (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टीलेशन) भारताची स्वतंत्र क्षेत्रीय नेव्हिगेशन उपग्रह सिस्टीम आहे. ‘नाविक’ दोन प्रकारच्या सेवा प्रदान करणार आहे. स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस (एसओएस) आणि रेस्ट्रिक्टेड सर्व्हिस असे दोन प्रकार असणार आहेत.

इस्रोची झेप : 1979 ते 2025
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. त्याची पहिली मोहीम 10 ऑगस्ट 1979 रोजी एसएलव्ही-3 इ1/ रोहिणी टेक्नॉलॉजी पेलोडद्वारे लाँच करण्यात आले. तेव्हापासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत इस्रोने 99 मोहिमा पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर 100 व्या मोहिमेसाठी जीएसएलव्ही-एफ 15 रॉकेटसोबत मंगळवारपासून उपग्रह एनव्हीएस-02 प्रक्षेपित करण्याचा काउंटडाउन सुरू झाले होते. 27 तासांचा काउंटडाउन पूर्ण झाल्यावर स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजयुक्त रॉकेटला 29 जानेवारी रोजी सकाळी 6.23 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. ही मोहीम इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या कार्यकाळातील पहिली मोहीम ठरली आहे. नारायणन यांनी 13 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला होता.
जीएसएलव्ही-एफ15 या रॉकेटने एनव्हीएस-02 उपग्रहाला भू-स्थिर स्थानांतरण कक्षेत स्थापित केले आहे. ‘नाविक’ उपग्रह प्रणाली भारताच्या नेव्हिगेशन सेवांमध्ये स्व-निर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘नाविक’च्या सेवा भारतीय उद्योगांना आर्थिक लाभ प्रदान करू शकतात. ‘नाविक’ भारतीय क्षेत्रात नेव्हिगेशन सेवा प्रदान करणार असल्यामुळे विदेशी नेव्हिगेशन प्रणालींवरील निर्भरता कमी होणार आहे. ‘नाविक’ अचूक आणि विश्वसनीय स्थिती आणि टाइम सेवा प्रदान करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.