उष्मालाटेमुळे फ्रान्समध्ये 1 हजार लोकांचा मृत्यू
जर्मनी, स्पेन, ब्रिटन समवेत 16 देशांमध्ये उच्चांकी तापमान : रस्ते वितळले, शाळा बंद, जंगलांमध्ये वणवे
वृत्तसंस्था
लंडन, पॅरिस, माद्रिद
युरोप सध्या उष्मालाटेला सामोरा जात असून फ्रान्समध्ये भीषण उष्णतेमुळे सुमारे 1 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. हे मृत्यू 24 ते 27 जून या कालावधीत झाल्याचे तेथील आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे. तर मृतामंध्ये वृद्धांचे प्रमाण 85 टक्के असून सर्वाधिक मृत्यू घरांमध्येच झाले आहेत, खासकरून राजधानी पॅरिस आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये या घटना अधिक समोर आल्या आहेत. तर जर्मनी, स्पेन, ब्रिटन, डेन्मार्क, इटली आणि स्वीत्झर्लंड समवेत 16 देशांमध्ये तापमानाने दशकांपूर्वीचा उच्चांक मोडला आहे.
रविवारी युरोपच्या सुमारे 19.1 कोटी लोकांना 35 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाला तोंड द्यावे लागले आहे. यामुळे काही ठिकाणी रस्ते वितळले असून शाळाही बंद ठेवाव्या लागल्या आहेत. तर अनेक जंगलांमध्ये आग भडकली आहे. युरोपचे तापमान जगाच्या सरासरी तापमानाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. भविष्यात उष्मालाटांचे प्रमाण अधिक राहणार असून त्यांचा कालावधीही अधिक राहणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रिटनमध्ये 50 वर्षे जुना विक्रम मोडीत
ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन दिवसांपर्यत रेड वॉर्निंग जारी करावी लागली. जून महिन्याचा 50 वर्षे जुना मागील विक्रम (35.6 अंश) मागील आठवड्यात मोडला गेला आहे. दक्षिण इंग्लंडमध्ये तापमान 36.4 अंशापर्यंत पोहोचले आहे. ब्रिटनच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान 40.3 अंश असून ते जुलै 2022 मध्ये नोंदविले गेले होते. हा विक्रम देखील यंदा मोडला जाऊ शकतो असे मानले जातेय. ब्रिटनमध्ये हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन आणि श्वसन समस्येच्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने अनेक मोठ्या रुग्णालयांना आणीबाणी घोषित करावी लागली आहे. पूर्ण ब्रिटनमध्ये 1 हजारांहून अधिक शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत.
स्पेनमध्ये पारा 45 अंशांपार
स्पेन सध्या पूर्ण युरोपमध्ये सर्वाधिक उष्ण ठरत आहे. तेथे एंडुजार शहरात तापमान 45.1 अंशांपर्यंत पोहोचले आहे. तर बिलबाओ शहरात पारा 42.7 अंश नोंदविला गेला. मागील 4 दिवसांमध्ये उष्णतेमुळे देशात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भीषण उष्णतेमुळे स्पेनच्या जंगलांमध्ये वणवे भडकले असून यामुळे अनेक वस्ती रिकामी कराव्या लागल्या आहेत.
जर्मनीत 41.5 अंश तापमान
जर्मनीच्या ड्रॅविट्ज शहरात तापमान 41.5 अंश नोंदविले गेले. हे जर्मनीच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. उष्णता अधिक असल्याने अनेक महामार्ग तुटू लागल्याने ते बंद करावे लागले आहेत. जर्मनीतील अनेक क्रीडा स्पर्धा, संगीत महोत्सव सुरक्षेच्या कारणांसाठी रद्द किंवा स्थगित करावे लागले आहेत.
डेन्मार्कमध्येही उष्णतेचे संकट
जर्मनीचा शेजारी देश डेन्मार्क थंड हवामानाचा मानला जातो, परंतु तेथेही यंदा उष्णता वाढल्याने लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. शनिवारी या देशात तापमान 37 अंश नोंद झाले. डेन्मार्कमध्ये 1874 पासून तापमानाची नोंद केली जात आहे, तेव्हापासूनच हे आतापर्यंतचे कमाल तापमान ठरले आहे. डेन्मार्कचे रस्तेही वितळू लागल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी कोपेनहेगन येथील प्रसिद्ध अमागर बीच आणि देशाच्या इतर किनारी भागांमध्ये लाखेंच्या संख्येत लोक पोहोचू लागले आहेत.
फ्रान्समध्ये सर्वात उष्ण दिवस
फ्रान्सच्या पिसोस शहरात तापमान 44.3 अंश नोंदविण्यात आले आहे. तर राष्ट्रीय स्तरावर सरासरी तापमान 30 अंशाहुन अधिक राहिले आहे. तेथे रात्रीचे तापमान देखील 22 अंशांपेक्षा कमी होत नसल्याचे चित्र आहे. तर वीज ग्रिड ठप्प झाल्याने तेथील 50 हजार घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.
इटली : 18 शहरांमध्ये रेड अलर्ट
इटलीत उष्णता सातत्याने वाढत असून सरकारने रोम, मिलान, वेनिस, फ्लोरेन्स आणि ट्यूरिन समवेत 18 शहरांमध्ये रेड हीट अलर्ट जारी केला आहे. भीषण उष्णतेमुळे देशातील सर्वात मोठी नदी पो ची जलपातळी वेगाने घटत असल्याने समुद्राचे खारे पाणी नदीपात्रात शिरू लागले आहे, यामुळे शेती आणि पेयजलावरील धोका वाढला आहे. सरकारने अनेक भागांमध्ये लोकांना दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
चेक प्रजासत्ताकमध्येही उष्मालाट
उष्मालाटेमुळे चेक प्रजासत्ताकही हवालदिल झाला आहे. तेथील डोक्सानी शहरात तापमान 40.6 अंशावर पोहोचले. हवामान विभागाने पूर्ण देशासाठी रेड अलर्ट जरारी करत लोकांना दुपारी घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
स्वीत्झर्लंडमध्येही तापमान वाढले
स्वीत्झर्लंडच्या बासेल शहरात तापमान 38.8 अंशापर्यंत पोहोचले आहे. हे देशाच्या इतिहासात जून महिन्यातील सर्वाधिक तापमान आहे. उष्णतेमुळे हिमनद्या वितळत असल्याने वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे.