For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या दोन खासदारांकडून 100 टक्के उपस्थितीचा विक्रम

06:35 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या दोन खासदारांकडून  100 टक्के उपस्थितीचा विक्रम
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

सतराव्या लोकसभेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाच्या सर्व दिवसांना लोकसभेत उपस्थित राहण्याचा विक्रम भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांनी केला आहे. मोहन मांडवी आणि भगिरथ चौधरी अशी त्यांची नावे आहेत. मोहन मांडवी हे छत्तीसगडमधील कांकेर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर भगिरथ चौधरी हे राजस्थानातील अजमेर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे या लोकसभेच्या संपूर्ण कार्यकाळात सर्वात क्रियाशील खासदार म्हणून सन्मान भारतीय जनता पक्षाच्याच पुष्पेंद्रसिंग चंदेल यांना मिळाला आहे.

सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ गेल्या शनिवारी संपला आहे. या पाच वर्षांच्या कार्यकाळात एकंदर 274 दिवस कामकाज चालले. या प्रत्येक दिवशी हे दोन्ही खासदार पूर्णवेळ उपस्थित राहिले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही 2019 मध्ये प्रथमच खासदार झालेले आहेत. या लोकसभेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीची सरासरी 79 टक्के भरली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

एकमेकांचा शेजार

लोकसभेत या दोन्ही खासदारांची बसण्याची जागा एकमेकांशेजारीच आहे. एकही कामकाजाचा दिवस चुकवायचा नाही, असा निर्धार या दोघांनी प्रारंभापासूनच केला होता. या दोघांनी लोकसभेत केवळ 100 टक्के उपस्थितीच दर्शविली असे नाही, तर सभागृहाच्या कामकाजात उत्साहाने भाग घेतला आणि अनेक प्रश्न विचारले. तसेच लोकसभेत भाषणेही केली आहेत. ज्या समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांच्या कामकाजामध्येही त्यांनी अशाच गांभीर्याने भाग घेतला आहे, असे लोकसभेच्या सचिवालयाच्या नोंदींमधून स्पष्ट होत आहे. या दोन्ही खासदारांचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

सर्वात क्रियाशील खासदारही भाजपचाच

भारतीय जनता पक्षाचे हमीरपूर (हिमाचल प्रदेश) येथील खासदार पुष्पेंद्रसिंग चंदेल यांना सतराव्या लोकसभेतील सर्वात क्रियाशील खासदार होण्याचा मान मिळाला आहे. या लोकसभेच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी 1 हजार 194 चर्चांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचेच अंदमान आणि निकोबारचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी 833 चर्चांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन दुसऱ्या स्थानी येण्याचा मान मिळविला असल्याची माहिती देण्यात आली.

एकाही चर्चेत भाग नाही

शत्रुघ्न सिन्हा (तृणमूल काँग्रेस), सनी देओल (भाजप), दिव्येंदू अधिकारी (तृणमूल काँगेस), रमेश जिगजिनगी (भाजप), बी. एन. बच्चेगौडा (भाजप), प्रधान बारुआ (भाजप), अनंतकुमार हेगडे (भाजप), श्रीनिवास प्रसाद (भाजप) आणि अतुलकुमार सिंग (बसप) या 9 खासदारांनी एकाही चर्चेत भाग घेतला नाही, अशी माहितीही लोकसभेच्या सचिवालयाने मंगळवारी प्रसिद्ध केली.

Advertisement
Tags :

.