इस्रायल-हमास युद्धाला 100 दिवस पूर्ण
अद्याप सर्व ओलिसांची मुक्तता नाही : इस्रायलकडून कारवाई सुरूच
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायल-हमास युद्धाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हवाई तसेच जमिनीच्या मार्गे हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने हमासच्या विरोधात युद्ध पुकारले होते. युद्धविरामावर चर्चा आणि ओलिसांची मुक्तता निश्चित करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांनंतरही हमासने अद्याप अद्याप सर्व ओलिसांना सोडलेले नाही.
तर दुसरीइडे इस्रायलमध्ये शनिवारी रात्री हजारोंच्या संख्येत नागरिक रस्त्यांवर उतरले. या लोकांनी सर्व ओलिसांची मुक्तता करविण्याचे आवाहन बेंजामीन नेतान्याहू सरकारला केले आहे. अद्याप 130 जण हमासच्या ताब्यात असून यातील काही जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर राजी किबुत्ज शहर, सैन्यतळ आणि सीमावर्ती शहरांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांदरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी 240 इस्रायली तसच विदेशी नागरिकांना बळजबरीने स्वत:सोबत गाझामध्ये नेले होते.
हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. अचानक करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे इस्रायली नागरिकांना यातून सावरण्याची संधीच मिळाली नव्हती. सुमारे 360 जणांचा मृत्यू नोवा फेस्टिव्हलच्या ठिकाणीच झाला होता. या फेस्टिव्हलमध्ये लोक इस्रायली सण साजरा करत असताना हा हल्ला झाला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी येथूनच 240 जणांना बळजबरीने स्वत:सोबत गाझामध्ये नेले होते.
गाझामध्ये युद्धविराम लागू करण्याचे प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. गाझामध्ये इस्रायलच्या सैन्याला कुठलीच शक्ती रोखू शकत नसल्याचे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. हमासचे अस्तित्व संपविण्याचा त्यांचा निर्धारत आहे. तर दुसरीकडे ओलिसांवरून इस्रायलचे नागरिक सातत्याने नेतान्याहू सरकारवर दबाव आणत आहेत.
कतारच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास यांच्यात 21 नोव्हेंबर रोजी चार दिवसांचा युद्धविराम झाला होता. याचा कालावधी एक आठवड्यापर्यंत वाढविण्यात आला होता. त्यावेळी 105 ओलिसांची मुक्तता करण्यात आली होती. याच्या बदल्यात इस्रायलने देखील 300 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली होती. युद्धविराम संपताच इस्रायलच्या सैन्याने पुन्हा बॉम्बवर्षाव सुरू केला.
24000 पॅलेस्टिनी ठार
हमासच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 24 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यात मोठ्या संख्येत महिला आणि मुलांचा समावेश आहे. याचबरोबर सुमारे 60 हजार पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. इस्रायलच्या कारवाईत पॅलेस्टिनींची सुमारे 3 लाख 60 हजार घरे जमीनदोस्त झाली आहेत.