100 Days Plan: कोकण विभागात चिपळूणचा डंका, 14 कार्यालये पहिल्या तीनमध्ये
जिल्ह्यातील विविध 14 कार्यालयांनी कोकण विभागात क्रमांक पटकावले आहेत.
चिपळूण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जिल्हास्तर कार्यालयानंतर तालुकास्तरावरील कार्यालयाचा अहवाल कोकण विभागाकडून सादर करण्यात आला असून त्यामध्ये जिल्ह्यातील विविध 14 कार्यालयांनी कोकण विभागात क्रमांक पटकावले आहेत.
यामध्ये चिपळूणमधील 6 कार्यालयांचा समावेश असून चिपळूणची उपविभागीय अधिकारी, उपविभागीय व तालुका कृषी, दापोली तहसीलदार कार्यालये प्रथम क्रमांकांनी ‘पास’ झाली आहेत. महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी एक 100 दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता.
या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजना, विकासाची कामे, अनेक प्रकल्प मार्गी लावण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची संकल्पना मांडली होती. आता या 100 दिवसांच्या कामांचा अहवाल राज्य सरकारकडून जाहीर केला जात आहे. यापूर्वी जिल्हास्तरावरील तर गुरुवारी तालुकास्तरावरील कार्यालयांच्या कामांचा अहवाल जाहीर झाला.
कोकण विभागात उपविभागीय अधिकारी चिपळूण, तहसीलदार दापोली, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय चिपळूण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिपळूण यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तालुका वैद्यकीय अधिकारी लांजा, तालुका कृषी अधिकारी खेड, मुख्याधिकारी नगर परिषद चिपळूण, उपविभागीय जलसंधारण अधिकारी चिपळूण, सहाय्यक निबंधक रत्नागिरी या कार्यालयांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय दापोली, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी, महावितरण लोटे उपविभाग, खेड, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालय क्रमांक एक रत्नागिरी, उपकोषागार अधिकारी चिपळूण या कार्यालयांनी कोकण विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.