For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात मोठ्या देणगीदाराचे भाजपला केवळ 100 कोटी

06:22 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात मोठ्या देणगीदाराचे भाजपला केवळ 100 कोटी
Advertisement

प्रादेशिक पक्षांनाही भरभरुन लाभ, बिगर भाजप पक्षांची एकंदर देणगी भाजपपेक्षाही जास्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक रोख्यांच्या वाहत्या पाण्यात कोणकोणत्या पक्षाने हात धुवून घेतले आहेत, याची नवनवी माहिती आता समोर येत आहे. या महितीमधून अनेक समज-गैरसमजही झपाट्याने दूर होत आहेत. एकंदर साधारणत: गेल्या पाच वर्षांमधील जवळपास 13 हजार कोटी रुपयांपैकी केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाला केवळ 40 टक्क्यांच्या आसपास रक्कम मिळाली आहे. या योजनेविरोधात ओरडा करणाऱ्या विरोधी पक्षांनाही भरभरुन रक्कम मिळाल्याचे आता स्पष्ट होत आहे. केवळ एका राज्यात अस्तित्व असणाऱ्या पक्षांच्या पदरातही  शेकडो कोटी रुपयांचे धन देणगीदारांनी टाकल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement

सर्व रोखे देणगीदारांमध्ये सर्वात मोठ्या ठरलेल्या फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीने एकंदर 1,342 कोटी रुपयांच्या देणग्या वाटल्या आहेत. या कंपनीवर केंद्र सरकारच्या ईडी या संस्थेने किमान चार वेळा धाड टाकलेली होती. तथापि, आश्चर्य म्हणजे या कंपनीने भारतीय जनता पक्षाला केवळ 100 कोटी रुपयांची देणगी दिली असून काँग्रेसलाही 50 कोटी दिले आहेत. या कंपनीने सर्वाधिक देणगी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला दिली असून ती तब्बल 542 कोटी रुपयांची आहे. याच कंपनीने 503 कोटी रुपयांची देणगी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला दिली आहे. यामुळे, ईडीची धाडी घालून किंवा ईडीची भीती दाखवून भारतीय जनता पक्षाने पैसा ‘वसूल’ केला, असा जो आरोप केला जात आहे, त्यात तथ्य नाही हे दिसून येत आहे.

तिसऱ्या क्रमांकाची कंपनी कोण

देणगी देण्यात क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या कंपन्यांनी कोणत्या पक्षाला किती दिले याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध होतच आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोलकता येथे नोंद झालेली एमकेजे ही कंपनी आहे. या कंपनीने एकंदर 617 कोटी रुपयांची देणगी दिली. यांपैकी भारतीय जनता पक्षाला 372 कोटी रुपये, तर काँग्रेस अलिकडच्या काळात बराच लहान पक्ष झाला असूनही त्याला या कंपनीने 161 कोटी रुपये दिले आहेत, तर तृणमूल काँग्रेसला 47 कोटी रुपये देण्यात आले आहेत. चौथ्या क्रमांकावरील आरपीएसजीच्या काठ कंपन्यांनी मिळून 584 कोटी रुपयांचे दान केले. त्यांच्यापैकी तब्बल 419 कोटी रुपये या कंपनीने तृणमूल काँग्रेसला दिलेले आहेत. तर भारतीय जनता पक्षाला अवघे 126 कोटी रुपये दिले आहेत. यावरुन प्रादेशिक पक्षांवरही देणगीदारांची मोठीच मेहेरनजर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केवळ भारतीय जनता पक्षावर वसुलीचा आरोप करणे किती निरर्थक आहे, हे सिद्ध होत आहे, असे तज्ञांचे मत आहे.

अन्य देणगीदारांकडूनही सर्व पक्षांवर खैरात

पाच ते दहा क्रमांकांवर असलेल्या देणगीदारांनीही केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे, तर जवळपास सर्वच प्रसिद्ध पक्षांचे हात देणग्यांनी ओले केले आहेत. त्यांच्यात आदित्य बिर्ला समूह, क्विक सप्लाय चेन, वेदांता समूह, भारती एअरटेल, जिंदाल समूह आणि टोरंट समूह यांची नावे आहेत. त्यांनीही प्रादेशिक पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत.

प्रथम 10 सर्वात मोठे देणगीदार

देणगीदार कंपनी समूह         भाजप               बिगरभाजप

  1. फ्युचर गेम्स 100 कोटी 1,242 कोटी
  2. मेघा समूह 584 कोटी 692 कोटी
  3. एमकेजे समूह 372 कोटी 245 कोटी
  4. आरपीएसजी 126 कोटी 458 कोटी
  5. आदित्य बिर्ला समूह 230 कोटी 333 कोटी
  6. क्विक सप्लाय चेन्स 375 कोटी 35 कोटी
  7. वेदांता समूह 227 कोटी 165 कोटी
  8. भारती समूह 197 कोटी 50 कोटी
  9. जिंदल समूह 003 कोटी 120 कोटी
  10. टोरंट समूह 107 कोटी 024 कोटी

एकंदर                    2,321 कोटी     3,364 कोटी

Advertisement
Tags :

.