यल्लम्मा देवस्थानच्या विकासासाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी मंजूर
खासदार जगदीश शेट्टर यांचे प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय पर्यटन विभागाच्यावतीने सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानच्या विकासासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून पर्यटनाला चालना देण्यासोबत देवस्थानचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी काही महिन्यांपूर्वीच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानचा विकास करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध होऊ शकला आहे.
केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी गुरुवारी देशाच्या 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये कर्नाटकातील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण 3 हजार 295 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. देशातील पर्यटन वाढावे, तसेच भाविकांना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने केंद्रीय पर्यटन विभागाने आराखडा तयार केला आहे.
कर्नाटकातील रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेतात. परंतु, त्यामानाने या ठिकाणी सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार खासदारांनी केली होती. याची दखल घेत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बेंगळूर येथील इको टुरिझम अॅण्ड कल्चरल हबसाठी 99.17 कोटी तर यल्लम्मा देवस्थानसाठी 100 कोटी निधी दिला जाणार आहे. खासदार शेट्टर यांनी पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार मानले आहेत.