10 वर्षाचा हिशोब बाकी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आधीच शाब्दिक युद्ध : ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स-नॅथन लियॉनने टीम इंडियाला डिवचले
वृत्तसंस्था/ सिडनी
बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 या वर्षीच्या शेवटी सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही ऐतिहासिक कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारी 2025 पासून खेळवला जाईल. विशेष म्हणजे, भारताने 2017 पासून शेवटची 4 बॉर्डर-गावसकर मालिका घरच्या मैदानावर दोनदा तर ऑस्ट्रेलियात 2018-19 आणि 2021-22 दोनवेळा ऐतिहासिक मालिका जिंकल्या आहेत. दरम्यान, या मालिकेच्या तीन महिने आधीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शाब्दिक जंग सुरु केली आहे. मागील 10 वर्षाचा पराभवाचा हिशोब बाकी असल्याचे म्हणत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सपासून ते स्टार स्पिनर नॅथन लियॉनपर्यंत अनेक खेळाडूंनी या मालिकेपूर्वी टीम इंडियाला डिवचले आहे.
प्रतिष्ठित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी यंदा ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून केवळ चाहतेच नाही तर क्रिकेटपटूही भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेआधीच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स व फिरकीपटू नॅथन लियॉन यांनी शाब्दिक युद्ध छेडले आहे. कांगारुंचा कर्णधार म्हणाला, मी आणि माझ्या संघातील अनेक खेळाडूंनी यापूर्वी कधीही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकलेली नाही. कसोटी संघ म्हणून आम्ही गेल्या काही वर्षांत काही आश्चर्यकारक गोष्टी साध्य केल्या आहेत. घरच्या मैदानावर प्रत्येक मालिका जिंकण्यासाठी आमचा स्वत:वर विश्वास आहे. या उन्हाळ्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकणे हेच आमच्यासाठी लक्ष्य आहे. अर्थात, पॅट कमिन्ससाठी गेली काही वर्षे स्वप्नवत आहेत. कर्णधार झाल्यापासून कमिन्सच्या नेतृत्वात कांगारुंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आणि नंतर एकदिवसीय वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. पण, आतापर्यंत कमिन्सला बॉर्डर-गावसकर मालिका जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाला हरवून ही ट्रॉफी जिंकण्याचा कमिन्सचा मानस आहे.
कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्शवर मोठी मदार
याशिवाय, कमिन्सने अष्टपैलू कॅमरुन ग्रीन व मिचेल मार्श यांच्यावर आगामी मालिकेत मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. तो म्हणाला, मागील काही वर्षांत ग्रीनला चांगला अनुभव आला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने फार काही गोलंदाजी केलेली नाही, असे जरी असले तरी यंदाच्या मालिकेत ग्रीनवर अधिक जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच मिचेल मार्श आणि ग्रीन यांच्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान कोणाला मिळेल, यावर बोलताना कमिन्स म्हणाला, ग्रीन आणि मार्श हे दोघेही टीममध्ये असल्याने आम्हाला बॉलिंगमध्ये सहा पर्याय उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे, हे दोघेही आयपीएलमध्ये दीर्घकाळ खेळत असल्याने त्यांना भारतीय खेळाडूंचा चांगला अभ्यास आहे. रोहित विराटसह अन्य खेळाडूंना लवकरात लवकर बाद करण्यासाठी या दोघांचा रोल महत्वाचा ठरेल, असेही कमिन्स यावेळी म्हणाला.
10 वर्षाचा हिशोब बाकी - फिरकीपटू लियॉन
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लियॉनही भारताविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. लियॉन म्हणाला की, 10 वर्षांपासून हे काम अपूर्ण आहे. आम्ही 2014-15 साली शेवटची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने चारही मालिका जिंकल्या आहेत. पण यंदा आम्ही कोणत्याही किंमतीत भारताला हरवण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी केलेल्या टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालविरुद्ध गोलंदाजी करण्यास उत्सुक असल्याचे लियॉनने सांगितले. मी अजून जैस्वालला भेटलेलो नाही, पण आम्हा सर्व गोलंदाजांसाठी ते मोठे आव्हान असेल. तो इंग्लंडविरुद्ध ज्या प्रकारे खेळला, ते मी जवळून पाहिले आणि मला वाटतं की त्याला रोखण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागेल, असेही लियॉन म्हणाला.
ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा मोठा ब्रेक
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने भारताविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका लक्षात घेऊन 8 आठवड्यांचा म्हणजेच जवळजवळ 2 महिन्याचा ब्रेक घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे उन्हाळ्यातील व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता त्याने स्वत:ला फ्रेश राहण्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी मर्यादित षटकांच्या संघात निवड झालेली नाही. याबाबत तो म्हणाला, मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपासून तब्बल 18 महिने गोलंदाजी करत आहे. ब्रेकदरम्यान मी गोलंदाजीपासून दूर राहीन. सात किंवा आठ आठवडे चांगला वेळ मिळेल आणि शरीर बरे होईल.
बॉर्डर-गावसकर मालिकेत टीम इंडियाचा दबदबा
अॅलन बॉर्डर आणि सुनील गावसकर या दोन दिग्गज माजी क्रिकेटपटूंच्या नावाने होणाऱ्या या मालिकेत आतापर्यंत टीम इंडियाच वरचढ राहिली आहे. उभय संघात आतापर्यंत 16 वेळा ही मालिका खेळवण्यात आली, यामध्ये टीम इंडियाने 10 वेळा तर ऑस्ट्रेलियाला 5 वेळा विजय मिळवला आहे. 2003-2004 साली खेळवण्यात आलेली ही मालिका ड्रॉ राहिली होती. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षापासून ऑस्ट्रेलियाला ही मालिका जिंकता आलेली नाही. 2014-15 मध्ये कांगांरुनी ही मालिका जिंकली होती. यानंतर पुढील चारही मालिकेत भारतीय संघाने यश मिळवले आहे. यंदाच्या वर्षी होणारी उभय संघातील मालिका नक्कीच चुरशीच होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मालिका महत्वाची
सध्याच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी दोन्ही संघांना अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. भारताला अजून 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. सर्वप्रथम, 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यानंतर न्यूझीलंडचे यजमानपद भूषवायचे आहे आणि मग या नोव्हेंबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौरा आहे. या दौऱ्यात तब्बल पाच कसोटी खेळवल्या जाणार असल्याने दोन्ही संघासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक
पहिला सामना - 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना - 6 ते 10 डिसेंबर, अॅडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना - 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथा सामना - 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना - 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
सुर्यकुमारला याबाबत विचारले असता, तो म्हणाला मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. ही जगातील सर्वोत्कृष्ट मालिका असून या मालिकेसाठी टीम इंडियात मला स्थान मिळाले तर सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सुर्याने आतापर्यंत दोनच कसोटी खेळल्या असून या मालिकेसाठी त्याला संधी मिळेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे दोघे वरिष्ठ खेळाडू कौंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असून या दोघांच्या कामगिरीकडेही निवड समितीचे बारकाईने लक्ष आहे. अर्थात, यासाठी अजित आगरकर शेवटी कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
श्रेयस अय्यर, शुभम दुबे, अक्षर पटेलला मिळणार एंट्री
नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या प्रतिष्ठित मालिकेसाठी रोहित शर्मा युवा व अनुभवी असा समतोल राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. एकाच मालिकेत अजित आगरकरसाठी ही निवड महत्वपूर्ण असणार आहे. ऑस्ट्रेलियात संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू असल्याने भारतासाठी ही मालिका नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.