हरियाणाच्या अंशुल कंबोजचे एकाच डावात 10 बळी
केरळविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी : रणजी क्रिकेट स्पर्धेत 10 बळी घेणारा तिसरा गोलंदाज
वृत्तसंस्था/ रोहतक, हरियाणा
रणजी करंडक स्पर्धेत हरियाणाकडून खेळणाऱ्या अंशुल कंबोजने एका डावात 10 विकेट्स घेत नवा विक्रम रचला आहे. केरळविरुद्ध रोहतक येथे सुरु असलेल्या लढतीत अंशुलने शॉन रॉजरला बाद करत डावातील सगळ्या विकेट्स पटकावण्याचा मान मिळवला. रणजी करंडक स्पर्धेत एका डावात 10 विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. 1956 मध्ये प्रेमांग्सू चॅटर्जी यांनी तर प्रदीप सुंदरम यांनी 1985 मध्ये 10 विकेट्स घेण्याची करामत केली होती. अंशुलच्या भेदक गोलंदाजीसमोर केरळचा संघ 291 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर हरियाणाने तिसऱ्या दिवसअखेरीस 7 बाद 139 धावा केल्या आहेत.
रोहतक येथील चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी करंडकातील या सामन्यात युवा गोलंदाज अंशुल कंबोजने आपल्या भेदक माऱ्याने केरळच्या फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले. केरळ संघात बाबा अपराजित, रोहन कन्नूमल, सचिन बेबी, जलाज सक्सेना अशा अनुभवी फलंदाजांचा समावेश होता. पण अंशुलच्या भेदक माऱ्यासमोर केरळच्या सर्वच फलंदाजांनी शरणागती पत्करली. केरळतर्फे रोहन कन्नूमल (55), अक्षय चंद्रन (59), मोहम्मद अझरुद्दीन (53) यांनी अर्धशतकी खेळी केली. शॉन रॉजरने 42 धावांचे योगदान दिले. गुरुवारी रणजीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कंबोजने केरळच्या आठ खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. शुक्रवारी सकाळी त्याने पहिल्याच षटकात थम्पीला बाद करून नववी विकेट घेतली आणि शॉन रॉजरला बाद करून आपली 10 वी विकेट पूर्ण केली, यामुळे केरळ संघ पहिल्या डावात 291 धावांत गुंडाळला गेला. 30.1 षटकात 9 निर्धाव षटकांसह 49 धावांच्या मोबदल्यात अंशुलने 10 विकेट्स पटकावल्या.
अंशुलने रचला इतिहास
रणजी क्रिकेटमध्ये हरियाणाकडून याआधी जोगिंदर शर्माने एका डावात आठ विकेट घेतल्या होत्या. 2004-5 मध्य विदर्भाविरूद्ध जोगिंदरने ही कामगिरी केली होती. जोगिंदर शर्माचा हा विक्रम अंशुलने मोडला असून रणजीमध्ये वैयक्तिक दहा विकेट घेत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. रणजी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका डावामध्ये दहाच्या दहा विकेट घेण्याच्या यादीमध्ये बंगालच्या प्रेमांग्सू चॅटर्जी यांनी 1956 मध्ये आसामविरूद्ध 20 धावांत 10, राजस्थानच्या प्रदीप सुंदरम यांनी 1985 मध्ये 78 धावांत 10 विकेट घेतल्या होत्या. आता या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी अंशुल कंबोज आला असून त्याने केरळविरुद्ध 49 धावा देत 10 विकेट घेतल्या आहेत.
ओडिशासमोर महाराष्ट्राचे लोटांगण
कटक : रणजी ट्रॉफीतील अन्य एका सामन्यात ओडिशाने महाराष्ट्राचा तीन गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे महाराष्ट्राची गुणतालिकेत मोठी घसरण झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने पहिल्या डावात 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात ओडिसाचा संघ 200 धावांत ऑलआऊट झाला व त्यांना पहिल्या डावात 38 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावातही महाराष्ट्राचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले व त्यांचा डाव अवघ्या 166 धावांत आटोपला. ओडिशाला विजयासाठी 129 धावांचे टार्गेट मिळाले. हे टार्गेट त्यांनी 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. दरम्यान महाराष्ट्राचा हा पाच सामन्यातील तिसरा पराभव ठरला आहे.
सेनादलाविरुद्ध मुंबईला विजयासाठी 111 धावांची गरज
नवी दिल्ली : सेनादलाविरुद्ध रणजी ट्रॉफीतील सामन्यात मुंबईला विजयासाठी 111 धावांची आवश्यकता आहे. सेनादलाला पहिल्या डावात 240 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने 288 धावा करत पहिल्या डावात 48 धावांची आघाडी घेतली. यानंतर शार्दुल ठाकुर व मोहित अवस्थीच्या भेदक माऱ्यासमोर सेनादलाचा दुसरा डाव 182 धावांत आटोपला व मुंबईला विजयासाठी 135 धावांचे आव्हान मिळाले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेरीस मुंबईने 1 गडी गमावत 24 धावा केल्या आहेत. सिद्धेश लाड 7 तर रघुवंशी 13 धावांवर खेळत आहेत. सामन्याचा आजचा शेवटचा दिवस असून मुंबईचा संघ विजय मिळवतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर रणजी सामन्यांचे निकाल
- मेघालय वि बडोदा, बडोदा 1 डाव व 261 धावांनी विजयी
- पाँडेचरी वि हिमाचल प्रदेश, हिमाचल 1 डाव व 17 धावांनी विजयी
- गुजरात 343 वि विदर्भ 8 बाद 512.
- बिहार वि पंजाब, पंजाब 1 डाव व 67 धावांनी विजयी
- अरुणाचल वि गोवा, गोवा 1 डाव व 551 धावांनी विजयी.