बस दुर्घटनांमध्ये दरवर्षी 10 हजार जणांचा मृत्यू
अनेक गोष्टी कारणीभूत : त्वरित उपाययोजना करण्याची गरज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
धोकादायक रस्ता, खराब अवस्थेतील वाहन, अकुशल चालक आणि क्षमतेपेक्षा अधिक भार अशी अनेक कारणे उत्तराखंडच्या अल्मोडा येथील बस दुर्घटनेमागे आहेत. या दुर्घटनेने देशातील रस्ते सुरक्षेच्या मूलभूत त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. देशात बस दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढले असून यातील जीवितहानीचे प्रमाण धक्कादायक आहे. देशात दरवर्षी बस दुर्घटनांमुळे 10 हजार जणांना जीव गमवावा लागत आहे.
रस्ते परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार चालकांनी वाहनांवरील नियंत्रण गमाविल्याने होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण 2022 मध्ये 5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले होते. अशा दुर्घटनांमध्ये 9,862 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 2023 ची आकडेवारी पुढील आठवड्यात जारी केली जाणार असून हे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत वाढल्याची शक्यता आहे.
चालक पूर्णपणे प्रशिक्षित नसणे
रस्ते परिवहन मंत्रालय दुर्घटनांच्या या प्रकरणांना रन ऑफ द रोड श्रेणीत समाविष्ट करते, म्हणजेच कुठलेही वाहन अनियंत्रित होत दुर्घटनाग्रस्त होणे. यात वाहनांना पर्वतीय भागांमध्ये दरीत कोसळण्याच्या घटनाही सामील आहेत. उत्तराखंडमधील दुर्घटना दु:खद आहे. परंतु यामागील कारण पूर्वीसारखीच आहेत. देशातील बहुतांश बसचालक पूर्णपणे प्रशिक्षित नाहीत आणि सुरक्षेच्या सामान्य मापदंडांचे देखील पालन होत असल्याचे रस्ते सुरक्षा तज्ञांकडून सांगण्यात येते.
ओव्हरलोडिंगमुळे वाढते जोखीम
उत्तराखंडमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते, यामुळे बस चालविण्यातील संतुलन आणि त्याच्या संवेगावर प्रभाव पडला असणार आहे. प्रत्येक बस सिटिंग कॅपेसिटी म्हणजेच त्यात उपलब्ध आसनांना विचारात घेऊन डिझाइन केली जाते, जितकी अधिक ओव्हरलोडिंग असेल, तितकीच जोखीम अधिक असणार आहे. 2022 मध्ये बसेसशी संबंधित 5 हजारांहून अधिक दुर्घटना झाल्या, ज्यात 1798 जणांचा मृत्यू झाला. जर वाहनांच्या श्रेणीच्या आधारावर दुर्घटना पाहिल्यास बसेसचे प्रमाण 40.9 टक्के असून त्यात जीव गमाविणाऱ्यांचे प्रमाण 28.7 टक्के आहे. उत्तराखंडच्या दुर्घटनेत चालकाला डुलकी आल्याने त्याने वाहनावरील नियंत्रण गमाविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा पैलू नवा नाही, परंतु याकरता उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.
मनोवैज्ञानिक समस्या
रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने मागील वर्षी गुरुग्राममध्ये 100 हून अधिक चालकांचे आरोग्य आणि त्यांच्या मनोवैज्ञानि स्तराची तपासणी केली होती, यात निम्म्याहून अधिक चालक उच्च रक्तदाब अथवा एखाद्या मनोवैज्ञानि समस्येने ग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यासाठी कामाची स्थिती प्रोफेशनल दृष्ट्या उपयुक्त नव्हती. अशास्थितीत उत्तराखंडसारख्या जोखिमयुक्त ठिकाणी वाहन चालविणे स्वाभाविक स्वरुपात धोकादायक असेल. वैध परवाना नसलेले लोकही व्यावसायिक वाहन चालवित आहेत, ही देखील मोठी समस्या आहे. सुमारे 12 टक्के दुर्घटना अशा वाहनचालकांमुळेच होत असतात.