चिदंबरनगर हरिमंदिर परिसरातून 10 भटकी कुत्री पकडली
बेळगाव : मोकाट जनावरे पकडण्यासह भटकी कुत्री पकडण्यावर महापालिकेच्या पशुसंगोपन खात्याकडून भर देण्यात आला आहे. चिदंबरनगर हरिमंदिर परिसरातून शुक्रवारी 10 भटकी कुत्री पकडून त्यांना हिरेबागेवाडी येथील एबीसी सेंटरमध्ये हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर निर्बिजीकरण करून पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडले जाणार आहे. शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांची संख्या वाढत चालली आहे. मध्यंतरी दोन्हीही कारवाया बंद ठेवण्यात आल्याने शहरात जनावरांसह कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्र्यांच्या कळपाकडून शाळकरी मुलांसह नागरिकांचा चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण झाले आहे.
हिरेबागेवाडी येथे शेल्टर उभारण्याचे काम सुरू
पकडलेल्या कुत्र्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यासाठी हिरेबागेवाडी येथे शेल्टर उभारण्याचे काम सुरू आहे.त्याचबरोबर भविष्यात दक्षिण आणि उत्तर भागातील कुत्र्यांसाठी शेल्टर उभारले जाणार आहेत. पण तोपर्यंत पर्यायी व्यवस्था नसल्याने किमान कुत्र्यांचे निर्बिजीकरण तरी करण्यात यावे. जेणेकरून कुत्र्यांची पैदास वाढणार नाही, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पुन्हा एकदा धरपकड सुरू झाली आहे. शुक्रवारी चिदंबरनगर हरिमंदिर परिसरातील 10 भटकी कुत्री पकडण्यात आली. सदर कारवाईत सातत्य ठेवून विविध ठिकाणची कुत्री पकडण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.