सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठात 10 टक्के राखीव जागा
30 एप्रिलपूर्वी अर्ज दाखल करण्याचे विद्यापीठातर्फे आवाहन : कार्यशाळेत दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरात उच्चशिक्षण घेता यावे यासाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमात 10 टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. एकूण 35 अभ्यासक्रम असून सायन्स,
कॉमर्स, आर्ट्स यासह इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे सीमाभागातील विद्यार्थ्यांनी 30 एप्रिलपूर्वी अर्ज दाखल करावेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे डॉ. नवनाथ वळेकर यांनी दिली.
शनिवारी गोवावेस येथील तुकाराम महाराज भवन येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. कविता वड्राळे, डॉ. श्रीपाल गायकवाड, मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शिवराज पाटील, दत्ता उघाडे, महेश जुवेकर यांसह इतर उपस्थित होते.
विद्यापीठातील 28 अभ्यासक्रम हे अनुदानित आहेत तर 10 ते 12 अभ्यासक्रम विनाअनुदानित आहेत. अनुदानित अभ्यासक्रमांची ट्यूशन फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या ट्यूशन फीमध्ये 25 टक्के सवलत मिळेल. त्याचबरोबर मोफत वसतीगृहाची व्यवस्था सीमाभागातील विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. केमिस्ट्री, झुऑलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अॅग्रो केमिकल, केमिकल सायन्स, एमसीए यासह विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॅकल्टीसाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांना सवलती देण्यात आल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारची सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. या अभ्यासक्रमांसाठीही 10 टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर एमबीए व इतर अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 8390083547 या क्रमांकाशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन डॉ. कविता वड्राळे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.