बिहारमध्ये वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू
मध्यप्रदेश-राजस्थानसह सहा राज्यात उष्णतेची लाट
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीने कहर केला आहे. देशभरात सुरू असलेल्या कडक उन्हात बिहारमधील तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बेगुसरायमध्ये 4 जणांचा, तर मधुबनीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा आणि 27 जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आसाम आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दमट वारे बिहारमध्ये पोहोचत असल्यामुळे ईशान्य भागात हवामान बदलले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून देशाच्या वायव्येकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढत आहे. राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा आणि पंजाबमधील अनेक भाग उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत. मध्यप्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान बदलल्यानंतर बेगुसरायमध्ये मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान, वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. भगवानपूर ब्लॉक परिसरातील मोख्तियारपूर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 1, मनोपूर गावातील रहिवासी रामकुमार सदा यांची 13 वर्षीय मुलगी अंशू कुमारी हिचा मृत्यू झाला. बलिया पोलीस स्टेशन परिसरातील भगतपूर येथे वीज कोसळून एका वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली.