बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या 10 जणांना अटक
विजापूर पोलिसांची कारवाई : 10 पिस्तूल, 24 जिवंत काडतुसे जप्त : सांगली-सोलापूर येथील आरोपींचाही समावेश
बेळगाव : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या 10 जणांना विजापूर पोलिसांनी मंगळवार दि. 18 रोजी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये विजापूरसह सांगली आणि सोलापूर येथील आरोपींचाही समावेश आहे. आरोपींकडून 10 पिस्तूल आणि 24 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
प्रकाश मरकी राठोड (रा. हंचिनाळ तांडा, विजापूर), अशोक परमु पांद्रे (रा. कराड दोड्डी, अडकेरी, विजापूर), सुजित सुभाष राठोड (रा. कडकी तांडा, ता. तुळजापूर जि. सोलापूर, राज्य महाराष्ट्र), सुखदेव उर्फ सुखी नरसू राठोड (रा. साई पार्क, विजापूर), प्रकाश भिमसिंग राठोड (रा. नागावी तांडा, ता. सिंदगी) गणेश शिवराम शेट्टी (रा. बसवण बागेवाडी), चन्नाप्पा मल्लाप्पा नागनूर (रा. नुल्वी ता. हुबळी, सध्या रा. विजापूर), संतोष किशन राठोड (रा. लोहगाव तांडा, ता. तिकोटा, जि. विजापूर), जनार्दन वसंत पवार (रा. ऐतवाडे, जि. सांगली, राज्य महाराष्ट्र) आणि सागर उर्फ सुरेश राठोड (रा. हंचनाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
विजापूर येथे सतीश प्रेमसिंग राठोड या तऊणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच चाकूने हल्ला करून खून करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी तपास करून 6 जणांना अटक केली होती. या प्रकरणातील पाचवा आरोपी सागर उर्फ सुरेश राठोड (रा. हंचनाळ) याने खून प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश गेमू लमाणी याला बेकायदेशीररित्या पिस्तूल पुरविल्याची माहिती समोर आली. त्यामुळे 13 फेब्रुवारी 2025 रोजी त्याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने अनेक जणांना पिस्तूल पुरविल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी तपास करून बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या 10 जणांवर छापे टाकून 10 पिस्तुली व 24 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. विजापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण Eिनबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शंकर मारिहाळ, पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.