छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड राज्याच्या सुकमा या जिल्ह्यात सुरक्षा सैनिकांनी 10 माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जिल्हा राखीव पोलीस दलाने ही कारवाई केली आहे. छत्तीसगड सरकारने केंद्र सरकारच्या साहाय्याने माओवाद्यांविरोधात मोठे अभियान चालविलेले असून गेल्या काही महिन्यांमध्ये 70 हून अधिक माओवादी मारले गेले आहेत, अशी माहिती राज्य सरकारकडून शुक्रवारी देण्यात आली आहे.
सुकमा हा जिल्हा माओवादी प्रभावित म्हणून गणला जातो. या जिल्ह्यातील वन भागात माओवादी लपले असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर कारवाईची योजना बनविण्यात आली. माओवादी लपलेल्या स्थानाभोवती सुरक्षा सैनिकांचे कडे करण्यात आले. त्यानंतर माओवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. तथापि, माओवाद्यांनी गोळीबार केल्याने प्रत्युत्तरासाठी सैनिकांनीही गोळीबार केला. या चकमकीत लपलेले 10 माओवादी ठार झाले. ही चकमक शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरू होती. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून अनेक शस्त्रास्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. या शस्त्रांमध्ये एके 47 रायफली आणि दारुगोळा यांचा समावेश आहे. माओवाद्यांच्या या टोळीकडे आधुनिक शस्त्रांचा साठा होता. गस्त घालणाऱ्या सैनिकांवर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. तथापि, याचा सुगावा आधीच लागल्याने कट असफल झाला.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
जिल्हा राखीव पोलीस दलाची या कारवाईसंदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी प्रशंसा केली आहे. या अभियानात जिल्हा राखीव पोलीस दलाची एक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक अशा दोन तुकड्यांनी भाग घेतला. दोन्ही तुकड्यांनी एकमेकींशी योग्य तो समन्वय ठेवून ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. यासाठी सुरक्षा दले अमिनंदनास पात्र आहेत. छत्तीसगडमधून माओवाद आणि नक्षलवाद निपटून काढण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असून शुक्रवारच्या धडक कारवाईमुळे या निर्धाराला आणखी बळ मिळाले आहे, असा संदेश मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांच्याकडून देण्यात आला आहे. जवळपास एक वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे सरकार छत्तीसगडमध्ये निवडून आल्यानंतर माओवादी आणि नक्षलवादी यांच्या विरोधात निर्णायक अभियान छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
माओवादी हिंसाचारात मोठी घट
छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या 11 महिन्यांमध्ये सुकमा, दंतेवाडा, बस्तर इत्यादी नक्षल प्रभावित आणि माओ प्रभावित भागांमधील हिंसाचार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. 2010 च्या तुलनेत माओवादी हिंसाचारात 72 टक्के घट झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या हत्यांमध्येही 88 टक्के घट झाली आहे. राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाईमुळे माओवाद्यांचा धोका घटला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 202 माओवादी हिंसाचाऱ्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर 812 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 723 माओवादी आणि नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करलेली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती या कारवाईनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात दिली गेली आहे.