बॉम्बस्फोट संशयिताची माहिती देणाऱ्यास मिळणार 10 लाखाचे बक्षीस
एनआयएकडून आरोपीचे छायाचित्र जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडविणाऱ्या आरोपीचा फोटो राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) जारी केला आहे. तसेच आरोपीविषयी माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
1 मार्च रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये अज्ञात व्यक्तीने स्फोटके असणारी बॅग ठेवून काढता पाय घेतला. सदर व्यक्ती कॅफेतून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच 10 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले. या घटनेत 9 जण जखमी झाले. या प्रकरणी एचएएल पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. नंतर हे प्रकरण केंद्रीय गुन्हे शाखेकडे सोपविले. फॉरन्सिक लॅबचा अहवाल येण्यापूर्वीच राज्य सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपविले.
एनआयएने तपास हाती घेतला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचे छायाचित्र जारी केले आहे. त्याच्याविषयी माहिती मिळाल्यास 080-29510900, 8904241100 या क्रमांकावर फोन करावा किंवा info.blr.nia@gov.in या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.