बिष्णोईच्या भावावर 10 लाखाचे इनाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या भावालाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरण (एनआयए) करीत असून त्याचा ठावठिकाणा उघड करणाऱ्यास किंवा त्याला पकडून देणाऱ्यास 10 लाखाचे इनाम घोषित करण्यात आले आहे. अनमोल बिष्णोई असे त्याचे नाव आहे.
प्राधिकरणाला तो गेल्या दोन वर्षांपासून हवा आहे. 2022 मध्ये प्राधिकरणाने त्याच्यावर दोन प्रकरणांमध्ये आरोप ठेवले आहेत. तसेच नुकत्याच महाराष्ट्रात घडलेल्या एका प्रकरणातही तो आरोपी आहे. हे प्रकरण एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या
अनमोल बिष्णोई हा संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या मानला जातो. खंडणी वसुली, हत्या इत्यादी अनेक प्रकरणांमध्ये त्याचा हात असावा असा प्राधिकारणाला संशय आहे. त्यांची टोळी लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीशी संबंधित असली, तरी ती स्वतंत्रपणेही गुन्हेगारीच्या क्षेत्रात कार्यरत आहे, असे प्राधिकारणाचे म्हणणे आहे.
2 वर्षांपासून फरार
अनमोल बिष्णोई हा गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण प्राधिकारणाकडून सातत्याने केला जात आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वीपासून त्याने गुन्हेगारी क्षेत्रात आपले बस्तान बसविले आहे. 9 महिन्यांपूर्वी त्याच्या एका स्थानावर एनआयएने धाड घालून अनेक बेकायेशीर शस्त्रे, रायफली, मोठ्या प्रमाणात बंदुकीच्या गोळ्या आणि इतर आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला होता. प्रक्षोभक लिखाण असणारी काही कागदपत्रे आणि इतर साधनेही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर काहीकाळ त्याचे नाव फारसे प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. पण महाराष्ट्रातील काही घटनांच्या नंतर आता त्याचे नाव पुन्हा गाजत आहे. त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल. त्याच्याकडून बऱ्याच गुन्ह्यांचा आणि कारस्थानांचा पत्ता लागेल, असा विश्वास एनआयएला आहे. त्याला पकडण्यासाठी प्राधिकारणाने विशेष पथकांवर उत्तरदायित्व दिले आहे.