दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये 10 ठार
खैबर पख्तूनख्वा येथे दहशतवादी हल्ला, सुरक्षा दलांचे वाहन लक्ष्य
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी निमलष्करी दलाच्या वाहनावर हल्ला केला. मृतांमध्ये चार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अन्य सहा नागरिकांचा समावेश आहे. हा हल्ला डेरा इस्माईल खान जिह्यातील दरबान प्रांतात झाला. हा भाग अफगाणिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तान सीमेला लागून आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिजात लेव्हीज फोर्सचे जवान चोरीला गेलेला ट्रक परत मिळवण्यासाठी जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यापूर्वी बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 18 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. या भागात सध्या दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये संघर्ष सुरू असलेला दिसतो. या चकमकीत 12 दहशतवादीही मारले गेल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या 48 तासांत बलुचिस्तानमध्ये विविध कारवायांमध्ये एकूण 23 दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यासाठी बलुच लिबरेशन आर्मी जबाबदार असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तान सरकारने 2007 मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केले होते.