महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भीषण अपघातात 10 ठार

10:08 AM Jan 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवारमधील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापूर येथे लॉरी उलटली : 19 जखमी, 7 जण गंभीर

Advertisement

कारवार : कारवार जिल्ह्याच्या यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग 66 वरील गुळ्ळापूर येथील घाटात लॉरी उलटून झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू तर अन्य 19 जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे 3 वाजता झाला. अपघातानंतर 9 जण जागीच ठार झाले तर एकाचा मृत्यू हुबळी येथील किम्स रुग्णालयात झाला. दुर्घटनेत सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना किम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 12 जखमींना यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

अपघातातील मृत आणि जखमी व्यक्ती हावेरी जिल्ह्यातील सवनूर येथील फळ आणि भाजी विक्रेते आहेत. कुमठा येथील आठवड्याच्या बाजारात फळे आणि भाजीची विक्री करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हा भयानक आणि दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. अपघातात मृत झालेल्यांची नावे फयाज इमामसाब जमखंडी (वय 45), वासीम वीरुल्ला मुडगेरी (वय 35), इजाज मुस्तफा मुल्ला (वय 20), सादीकबाशा फारश (वय 30), गुलाम हुसेन जवळी (वय 40), इम्तियाज मुमजापर मुळकेरी (वय 36), अब्बास जाफर मंडक्की (वय 25), जीलानी अब्दुल जकाती (वय 25), असलम बाबुली बेल्लो (वय 24) अशी आहेत. हे सर्वजण जागीच ठार झाले आहेत. जलाल तारा (वय 30) याचा मृत्यू हुबळी येथील किम्स रुग्णालयात झाला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, हावेरी जिल्ह्यातील सवनूर येथील सुमारे 30 फळे आणि भाजी विक्रेते एचकेपी रोडलाईन्स या

लॉरीमधून कुमठा येथील आठवड्याच्या बाजाराला निघाले होते. हे सर्वजण फळांच्या आणि भाजीपाल्यांच्या पोत्यांवर व गाठोड्यांवर बसून यल्लापूरमार्गे कुमठ्याला निघाले होते. रस्ता जंगलमय आणि घाटाचा असल्याने सर्वत्र धुके पसरले होते. लॉरी गुळ्ळापूर येथील घाटात आली असताना चालकाला धुक्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज आला नाही. समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लॉरी रस्त्यावर असलेल्या विद्युतखांबाला आदळली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. लॉरी उलटल्याने व्यापारी फळे आणि भाजीच्या पोती-गाठोड्यांखाली अडकल्याने चिरडले गेले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस दोन जेसीबी व क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने यल्लापूर आणि हुबळी येथील रुग्णालयात हलविले. मृतदेहही यल्लापूर सरकारी रुग्णालयात हलविले. अपघात जेव्हा घडला तेव्हा ताडेतीन वाजले होते. त्यामुळे धुके अंधार आणि थंडीमुळे पोलिसांना मदतकार्य करताना फार मोठी कसरत करावी लागली.

किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची नावे 

अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या आणि हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांची नावे अश्रफ नबीसाब (वय 78, लॉरी चालक), ख्वाजा मोहम्मदगौस किस्मतगार (वय 22), मोहम्मद सादीक ख्वाजामीर बपेरी (वय 25), ख्वाजा मैनुबशीर अहम्मद कालेकाछन्नावर (वय 24), निजाम (वय 30), मदलानसाब (वय 24), जाफर मुल्तीयार (वय 22) अशी आहेत. यल्लापूर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची नावे मलिकरेहान मोहम्मदरफीक अक्की (वय 21), अफ्ताब बशीरअहम्मद मंचली (वय 23), गौसमैद्दीन अब्दुलराणी बोमनहळ्ळी (वय 32), इरफान मुकशुल गुडीगेरी (वय 17), नूरअहम्मद जमखंडी (वय 30), आझर कांजाड (वय 34), सुमाजगौडर (वय 77), खादरी जवळी (वय 26), साबीर अहम्मद बाबाहुसेन गवारी (वय 38), मर्दानसाब ताराडीग (वय 22), रफाईबाकर चौर (वय 21) आणि मोहम्मद गौस अक्तर (वय 22) अशी आहेत.

पंतप्रधानांकडून 2 लाखाची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुळ्ळापूर येथील अपघाताची दखल घेतली असून जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ दे, अशी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय परिहार निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

राज्य सरकारकडून 3 लाखाची मदत जाहीर 

राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. सिद्धरामय्या यांनी शिग्गावचे आमदार यासीर अहम्मदखान पठाण यांना यल्लापूरला जाण्यास सांगून मदत कार्यावर नजर ठेवण्याची सूचना केली आहे. शिवाय अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सहा रुग्णवाहिकांतून नऊ मृतदेह सवनूरला नेले 

यल्लापूर सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या मृतदेहांवर जिल्हा प्रशासनाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सहा रुग्णवाहिकांतून नऊ मृतदेह नेण्यात आले. यावेळी यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार, शिग्गावचे आमदार यासीर अहमद खान पठाण, कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, मंगळूरचे आयजीपी अमित सिंग, कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण, असिस्टंट कमिशनर काव्यावाणी आदी उपस्थित होते. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article