For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कचरा वेचक महिलांना 10 कोटींचा ‘जॅकपॉट’

06:26 AM Jul 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
कचरा वेचक महिलांना 10 कोटींचा ‘जॅकपॉट’
10 crores 'jackpot' for waste picker women
Advertisement

केरळमधील 11 जणींनी प्रत्येकी 25 रुपये काढून खरेदी केलेले लॉटरी तिकीट ठरले भाग्यवान विजेते

Advertisement

► वृत्तसंस्था/ कोझिकोड

केरळमध्ये उसने घेतलेल्या अल्प रकमेतून 11 महिला रातोरात करोडपती झाल्या आहेत. या महिलांकडे काही आठवड्यांपूर्वी लॉटरीची तिकिटे घेण्यासाठी 250 रुपयेही नव्हते आणि आता त्यांना 10 कोटी रुपयांच्या लॉटरीचा ‘जॅकपॉट’ लागला आहे. या महिलांनी आपण अल्पावधीत करोडपती होऊ असा विचार कधी स्वप्नातही केला नसेल. नुकत्याच झालेल्या ड्रॉनंतर केरळ लॉटरी विभागाने त्यांचे तिकीट 10 कोटी रुपयांच्या मान्सून बंपरचा विजेता घोषित केले.

Advertisement

काही आठवड्यांपूर्वी जेव्हा महिलांनी 250 रुपये किमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या पर्समध्ये 25 रुपयेही नव्हते. त्यांच्यापैकी एकाने आपले नशीब आजमावण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून थोडी रक्कम उसनवारीवरही घेतली होती. या 11 महिला केरळच्या परप्पनगडी नगरपालिकेच्या अंतर्गत ‘हरित कर्म सेने’मध्ये कचरा वेचण्याचे काम करतात. बंपर लॉटरी विजेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी येथील महापालिका संकुलात गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांसह प्रसारमाध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

गरिबांचे नशीब चमकते याचे नुकतेच उदाहरण समोर आले आहे. ही कथा केरळमधील मलप्पुरम येथील परप्पनगडी नगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या ‘हरित कर्म सेने’च्या (एचकेएस) 11 महिला सदस्यांची आहे. त्यांनी मान्सून बंपर लॉटरीचे पहिले बक्षीस म्हणजे 10 कोटी रुपये जिंकले आहेत. 250 रुपये गोळा करण्यासाठी नऊ जणींनी 25-25 रुपये आणि दोघींनी प्रत्येकी साडेबारा रुपये दिल्याचे सदर महिलांनीच सांगितले.

लॉटरी जिंकणाऱ्या महिलांमध्ये पी पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालू आणि पी लक्ष्मी यांचा समावेश आहे. सदर स्त्रिया आपले कुटुंब चालवण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून घरातून आणि आस्थापनांमधून जैवविघटन न होणारा कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. या महिला पालिकेतील 57 सदस्यांच्या ‘एचकेएस’ गटाच्या प्रतिनिधी आहेत.

‘स्वप्ने साकारण्याचा इरादा’

बक्षिसाची रक्कम जिंकल्यानंतर महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला असला तरी त्यांनी आपले कचरा उचल करण्याचे जुने काम सुरूच ठेवण्याचा इरादा सध्या व्यक्त केला आहे. अशा पद्धतीने पैसे एकत्र करून आम्ही खरेदी केलेले हे चौथे लॉटरी तिकीट असल्याचे परप्पनगडी येथील मूळ रहिवासी असलेल्या पार्वतीने सांगितले. तर काहींनी लॉटरीतून मिळालेल्या पैशातून नवनवी स्वप्ने साकारण्याचा विचार व्यक्त केला. या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी, आपल्या मुलांचे शिक्षण आणि कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी वापरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला प्रामाणिक व कष्टाळू : नगराध्यक्ष

परप्पनगडी नगरपालिकेचे अध्यक्ष उस्मान ए यांनी लॉटरी तिकीट विजेत्या नशीबवान असल्याचे सांगत त्या प्रामाणिक आणि कष्टाळू असल्याचे म्हटले आहे. नशिबाने त्यांना मोठी साथ दिली आहे. इतके दिवस या महिला स्वत:ला आणि आपल्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत होत्या, असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :

.