शाळा-महाविद्यालयांच्या विकासासाठी 10 कोटीचे अनुदान
पालकमंत्र्यांचे आश्वासन, जिल्ह्यातील 61 विद्यार्थ्यांचे रँकिंग : के-सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. के-सीईटी परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. खासगी शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध असतात. परंतु सरकारी शाळांमध्ये अनेक सुविधांचा अभाव असतानाही उल्लेखनीय यश विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. शाळा-महाविद्यालयांच्या पायाभूत विकासासाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. मंगळवारी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात के-सीईटी परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर जि. पं. सीईओ राहुल शिंदे, आमदार असिफ सेठ, पदवीपूर्व शिक्षणाधिकारी एम. एम. कांबळे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सीईटी सक्षम हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे सरकारी पदवीपूर्व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी मदत झाली.
सरकारी शाळा व पदवीपूर्व कॉलेजमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने दरवर्षी 5 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. यमकनमर्डी मतदारसंघात 100 हून अधिक शाळांचे बांधकाम करण्यात आले आहे. अजून काही शाळा बांधण्यात आल्या तर पुढील 30 वर्षांपर्यंत मूलभूत सुविधांची समस्या राहणार नाही. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने प्रत्येक तालुक्यातील दोन शाळा व कॉलेजला प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले जाणार आहे. तर मजलट्टी व बैलहोंगल येथील दोन महाविद्यालयांना 5 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राहुल शिंदे म्हणाले, सीईटी सक्षमद्वारे प्रशिक्षण घेतलेल्यांना जिल्ह्यातील एकूण 61 विद्यार्थ्यांनी 50 हजाराच्या आत रँकिंग मिळविले आहे. मागीलवेळी केवळ ही संख्या चार होती. यावेळी मात्र ती संख्या 61 वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार असिफ सेठ, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार बाबासाहेब पाटील, विनय नवलगट्टी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकारी उपस्थित होते.