उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर
भाजप नेत्याचा दावा : राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजप नेते मथुरा दत्त जोशी यांनी केला आहे. या दाव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर जोशी यांच्या या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण माहरा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपमध्ये काँग्रेसचे अनेक नेते यापूर्वीच शिरले आहेत, या नेत्यांमुळे सत्तारुढ पक्षात उलथापालथ सुरू असल्याचा प्रतिदावा मारहा यांनी केला.
मथुरा दत्त जोशी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता जोशी यांनी राज्यातील मुख्य विरोधी पक्षाचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य केले आहे. हे आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातून एकजुटतेचा मंत्र घेऊन उत्तराखंडमध्ये परताच काँग्रेस नेत्यांना जोशी यांच्या दाव्यामुळे धक्का बसला आहे. राज्यात 2027 मध्ये विधानसभा निवडणूक हेणार आहे. काँग्रेस राज्याची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. आगामी काळात विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये पक्षाला मजबूत करण्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशानात जोर देण्यात आला आहे. यात उत्तराखंडचाही समावेश आहे.
भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता : माहरा
जोशी यांच्यापूर्वी अनेक वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता अहे. सत्तारुढ पक्षातच उलथापालथ सुरू आहे. तर काँग्रेस पूर्णपणे एकजूट आहे. पक्षाचे आमदार अन्यत्र जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा करण माहरा यांनी केला आहे.