10 कंपन्या होणार शेअरबाजारात सुचीबद्ध
लिला हॉटेल, एजिस, प्रोस्मार्टचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
या आठवड्यात शेअरबाजारात जवळपास 10 कंपन्या सुचीबद्ध होणार आहेत. यामध्ये मुख्य बोर्डवर चार आणि स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायझेस 6 कंपन्या असणार आहेत. यामध्ये लिला हॉटेल (श्लॉस बेंगळूर), एजिस वोपाक टर्मिनल्स, प्रोस्टार्म इन्फो सिस्टम्स व स्कोडा ट्युबस् यांचा समावेश असेल. लिला हॉटेल्स आणि एजिसचे समभाग सोमवारी सुचीबद्ध झाले आहेत. प्रोस्टार्मचा समभाग 3 जून रोजी व स्कोडाचा समभाग 4 जूनला सुचीबद्ध होण्याची शक्यता सांगितली जात आहे. श्लॉस बेंगळूर, एजिस व प्रोस्टार्म यांचा आयपीओ अनुक्रमे 4.5 पट, 2.09 पट आणि 9.2 पट सबस्क्राइब झाला.
दुसरीकडे एसएमई गटातही ब्लू वॉटर लॉजिस्टीक्स, निकीता पेपर्स, एस्टोनिया लॅब्ज, एनआर वंदना टेक्स इंडिस्ट्रीज, नेप्च्युन पेट्रोकेमिकल्स आणि 3 बी फिल्म या कंपन्यांचे समभाग सुचीबद्ध होणार आहेत. तर गंगा बाथ फिटींग्ज यांचा आयपीओ 4 जून ते 6 जूनपर्यंत सबस्क्रीप्शनसाठी खुला असणार आहे. कंपनी 6.67 दशलक्ष समभागांच्या माध्यमातून 32.65 कोटी रुपये उभारणार आहे. 46 ते 49 रुपये समभागाची किमत निश्चित करण्यात आलीय.
यातील ब्लू वॉटर, निकीता पेपर्स व एस्टोनिया यांचे समभाग 3 जून रोजी सुचीबद्ध होणार आहेत. एनआर वंदनाचे समभाग 4 जून रोजी सुचीबद्ध होतील. 3 बी फिल्मचे समभाग 6 जूनला सुचीबद्ध होऊ शकतात. नेप्च्युनचा समभाग 4 जूनला एनएसईवर सुचीबद्ध होईल.