सांगरूळ येथे शॉर्टसर्किटने 10 एकरातील ऊस जळून खाक; 25 शेतकऱ्यांचे सुमारे 7 ते 8 लाखाचे नुकसान
सांगरुळ / वार्ताहर
सांगरुळ येथे गावाच्या पश्चिमेकडील तांबर नावाच्या शेतामध्ये महावितरण कंपनीच्या शेतीपंपाच्या विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट होवून ऊसाच्या फडाला आग लागली. यामध्ये सुमारे दहा एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.या आगीत पंचवीस तीस शेतकऱ्यांचे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागून मोठ्या प्रमाणावर ऊस पेटल्याची तालुक्यातील ही सर्वात मोठी घटना आहे.
चालू वर्षी सर्वच साखर कारखान्यांच्या कडे ऊसतोड मजुरांची टंचाई आहे .सांगरुळ येथे यावर्षी ऊसतोड मजूर टंचाई असल्याने, आता पर्यंत फक्त पन्नास टक्के उसाची तोड झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान सांगरुळच्या पश्चिमेकडील तांबर नावाच्या शेतामध्ये महावितरणच्या शेती पंपाच्या विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट झाले. यामुळे उसाच्या फडाला अचानक आग लागली. उन्हाचा तडाका व वाऱ्याचा मोठा प्रभाव असल्याने आगीनं रौद्ररूप धारण केले. बघता बघता आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली. की दहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.यावेळी काही शेतकऱ्यांनी नदी काठावरील शेती पंप सुरू करून पाणी मारत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले तर काही शेतकऱ्यांनी ऊस तोडून भांगा मारला,यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. यामध्ये प्रशांत वासुदेव नाळे ,सर्जेराव नाळे ,वसंत शिवाजी नाळे ,संग्राम दिनकर नाळे ,सुधाकर चाबूक यांच्यासह पंचवीस ते तीस शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागली यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.