जिह्यात 11 हजार कुणबी नोंदी
शाहूवाडी, करवीर, कागल तालुक्यात नोंदींचे प्रमाण वाढले
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य सरकारच्या निर्देशानुसार राज्यभर कुणबी नोंदी शोध मोहीम सुरु आहे, जिह्यात आतापर्यंत 11 हजार 250 कुणबी जातीच्या नोंदी विविध अभिलेखांच्या माध्यमातून आढळल्या आहेत. शाहूवाडी, करवीर व कागल तालुक्यात सर्वाधिक नोंदी मिळाल्या आहेत. सर्व तहसीलदार कार्यालये, कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर पुरालेखागार कार्यालय व नगरपालिकांमध्ये या नोंदी शोधण्याचे काम वेगाने सुरु आहे.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी संपूर्ण राज्यभर मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याचे समन्वयक अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आहेत. त्यांच्याकडून दररोज या नोंदीबाबत संपूर्ण जिह्यातून आढावा घेतला जात आहे. अभिलेखांची तपासणी करताना अभिलेख्यांचे प्रकार, तपासणी करण्याच्या पानांची संख्या, नोंदीची संख्या, आढळलेल्या नोंदी, तपासलेल्या नोंदीची संख्या, कुणबी जातीच्या आढळलेल्या नोंदीची संख्या, आदी माहिती विहित नमुन्यात भरुन घेतली जात आहे. त्यानुसार दोन दिवसात केलेल्या शोधमोहिमेत 11 हजार 250 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये कळंबा मध्यवर्ती कारागृह-3, गडहिंग्लज तहसीलदार कार्यालय- 5, कागल तहसीलदार कार्यालय-1577, हातकणंगले तहसीलदार कार्यालय-432, करवीर तहसीलदार कार्यालय-2827, आजरा तहसीलदार कार्यालय-719, पन्हाळा तहसीलदार कार्यालय- 600, राधानगरी तहसीलदार कार्यालय- 271, गगनबावडा तहसीलदार कार्यालय- 152, भुदरगड तहसीलदार कार्यालय- 992, शाहूवाडी तहसीलदार कार्यालय-3557, नगरपालिका-95, कोल्हापूर पुरालेखागार कार्यालय-20 नोंदींचा समावेश आहे.
कुणबी दाखले न मिळाल्याने दोन पिढ्यांचे नुकसान
कुणबी असूनही कुणबीची प्रमाणपत्रे न मिळाल्याने गेल्या दोन पिढ्यांचे नुकसान झाले. याला कोण जबाबदार हे शोधावे लागेल ? अशी भावना सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासमोर मांडली. तसेच सध्या सुरु असलेली कुणबी नोंद शोधमोहीम जिल्हा प्रशासनाने अधिक गतीने राबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी नोंदीसंदर्भात सकल मराठा समाज व निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी समन्वयक ॲड. बाबा इंदुलकर, वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, बाबा पार्टे, दिलीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, अवधूत पाटील, बाजीराव नाईक, सुनीता पाटील, शैलजा भोसले, संयोगिता देसाई आदी उपस्थित होते.
बाबा इंदुलकर म्हणाले, कुणबी दाखले न मिळाल्याने गेल्या दोन पिढ्यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण हे शोधावे लागेल. 2014 ला मराठ्यांना आरक्षण देताना कुणबी नोंदी न तपासल्यानेही मोठे नुकसान झाले आहे.वसंतराव मुळीक म्हणाले, 1931 ला झालेल्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिह्यातील कुणबींची लोकसंख्या 80 टक्के होती. परंतु 1932 ला तत्कालिन क्षात्र जगदगुरु यांनी सर्व मराठ्यांना कुणबीऐवजी क्षत्रिय मराठा असा उल्लेख करण्यास सांगितले. त्यामुळे कुणबीच्या नोंदी कमी झाल्या. 183 क्रमांकावर कुणबी जात आहे. ते म्हणाले, जिह्यात मोडी भाषा अवगत असणारे सुमारे दोन हजार लोक आहेत. तसेच कुणबीचे काही जुने दस्तावेज हे मोडी भाषेतील आहेत. त्यामुळे हे दस्तावेज तपासण्यासाठी प्रत्येक तालुक्याला किमान दोन मोडीवाचक नेमावेत. सध्या सुरु असलेल्या कुणबी नोंद शोधमोहिमेच्या कामाला अधिक गती द्यावी.
जिह्यात कुणबींच्या दीड ते दोन लाख नोंदी शक्य
जिह्यात कुणबींच्या सुमारे दीड ते दोन लाख नोंदी असण्याची शक्यता आहे. राधानगरी तालुक्यात मराठ्यांच्या नावापुढे बिगर मागास अशी नोंद आहे, त्यामुळे त्यांना कुणबी दाखले द्यावेत. तसेच कुळंबी, कुळवाडी, कुरवाडी अशा नोंदीही ग्राह्य धरण्यात याव्यात, असे वसंतराव मुळीक यांनी सांगितले.
मनोज जरांगे-पाटील 17 रोजी कोल्हापुरात
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात येणार आहेत. येथे ते सकल मराठा समाजाच्या गाठीभेटी घेणार आहेत. सकल मराठा समाज कोल्हापूरतर्फे त्यांच्या सभेचे नियोजन करण्याची तयारी सुरु आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यास 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. वाशी येथून त्यांच्या या दौऱ्यास सुरुवात होईल. पुढे परांडा, करमाळा, दौंड, मायनी, सांगली असे दौरे करत ते 17 रोजी दुपारी 2 वाजता कोल्हापुरात दाखल होतील. येथे ते आरक्षणाबाबत सकल मराठा समाजाला मार्गदर्शन करतील या दृष्टिकोनातून त्यांच्या सभेच नियोजन सुरु आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते कोल्हापुरात असणार आहेत. यानंतर ते इस्लामपूरकडे मार्गस्थ होतील.