पाकमध्ये तीन दिवसात 21 दहशतवादी ठार
खैबर पख्तुनख्वामध्ये मोठी लष्करी मोहीम
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सुरक्षा दलांनी गेल्या तीन दिवसात 21 दहशतवाद्यांना ठार केले आहे. ही संपूर्ण कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. लष्कराच्या माध्यम शाखेने शनिवारी ही घोषणा केली. उत्तर वझिरिस्तान जिह्यात गेल्या 72 तासांपासून ही चकमक सुरू होती. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये चार प्रमुख म्होरक्यांचा म्हणजेच कमांडरांचा समावेश होता. हे कमांडर सुरक्षा दलांवरील हल्ले आणि नागरिकांच्या हत्यांप्रकरणी वॉन्टेड होते. सरकार या दहशतवाद्यांना ‘फितना-अल-खवारीज’ असे संबोधते. ते बंदी घातलेल्या ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या संघटनेचे दुसरे नाव आहे.
लष्कराच्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात एकूण 48 दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs आणि दारुगोळा जप्त केला आहे. परिसरात लपून बसलेल्या उर्वरित दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा सतत शोधमोहीम राबवत आहेत. दहशतवादाविरोधातील ही मोहीम भविष्यातही सुरू राहील, अशी माहितीही लष्कराकडून देण्यात आली.
यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लष्कराने दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर, जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरानशाहमध्ये एक आत्मघाती हल्ला हाणून पाडण्यात आला. या घटनेनंतर तेथे कलम 144 लागू करण्यात आले. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीजच्या अहवालानुसार, देशातील सुरक्षा परिस्थिती खालावली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये परिस्थिती काहीशी बरी होती. तथापि, मे 2026 मध्ये खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचारात अचानक लक्षणीय वाढ झाल्यामुळेच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.