6 कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यात 1 लाख कोटींची वाढ
स्टेट बँक, आयसीआयसीआय आघाडीवर : टीसीएस पिछाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहापैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेच्या बाजार मूल्यात सर्वाधिक वाढ झालेली आहे.
शेअर बाजारातील आघाडीवरच्या 10 पैकी 6 कंपन्यांचे बाजारमूल्य 1 लाख 7 हजार 366 कोटी रुपयांनी मागच्या आठवड्यात वाढलेले पाहायला मिळाले आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निर्देशांकाचे दिवाळीच्या निमित्ताने एक नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नवे संवत 2081 च्या शुभारंभ प्रसंगी विशेष सत्राचे आयोजन केले गेले होते. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 321 अंकांनी वधारला होता.
मागच्या आठवड्यातील कंपन्यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या बाजार भांडवलामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि इन्फोसिस कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मात्र घसरणीत राहिले होते. स्टेट बँकेच्या बाजार भांडवल मूल्यात 36 हजार 100 कोटी रुपयांची घसरण झालेली असून ती 7 लाख 32 हजार 755 कोटी रुपयांवर स्थिरावली आहे. दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्यसुद्धा 25,775 कोटी रुपयांनी घटत 9 लाख 10 हजार 686 कोटी रुपयांवर राहिले आहे.