6 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 1 लाख 85 हजार कोटींची वाढ
एलआयसी, इन्फोसिस आघाडीवर : मागच्या आठवड्यात सेन्सेक्स 728 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहापैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मध्ये 1 लाख 85 हजार कोटी रुपये वाढले होते. यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले दिसून आले.
मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 728 अंकांनी किंवा 0.90 टक्के वाढला होता. बाजारातील 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य एकंदर 1 लाख 85 हजार 186 कोटी रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले.
यांच्या भांडवलात वाढ
जीवनविमा क्षेत्रातील एलआयसी कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 44,907 कोटी रुपयांनी वाढून 7 लाख 46 हजार 602 कोटी रुपयांवर पोहोचले होते. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार मूल्य 35 हजार 665 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 80 हजार 062 कोटी रुपयांवर पोहोचले होते. आयटीसीचे बाजार मूल्य 35 हजार 363 कोटींनी वाढत 6 लाख 28 हजार 042 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याच जोडीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार मूल्य 30826 कोटी रुपयांनी वाढत 15 लाख 87 हजार 598 कोटी रुपयांवर आणि भारती एअरटेलचे बाजार भांडवल 30282 कोटी रुपयांनी वाढत 8 लाख 62 हजार 211 कोटी रुपयांवर पोहोचले. खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 8140 कोटींनी वाढत 12 लाख 30 हजार 842 कोटी रुपयांवर पोहोचले.
33 हजार कोटीची बाजारात गुंतवणूक
विदेशी गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये आतापर्यंत 33 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय समभागांमध्ये केलेली आहे. धोरणात्मक बदल, स्थिर आर्थिक गती आणि अपेक्षेपेक्षा जास्त कंपन्यांनी मिळवलेला तिमाहीतील नफा या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास भारतीय शेअर बाजारावर अधिक दिसून आला.
म्हणूनच जुलै 26 पर्यंत पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 33 हजार 688 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जून महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 26,565 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात केली होती. त्यावेळेला राजकीय स्थिरता आणि बाजारातील तेजी यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाले होते. मे महिन्यात मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी 25 हजार 586 कोटी रुपये काढून घेतले होते.
यांच्या मूल्यात घसरण
दुसरीकडे देशातील दिग्गज उद्योग क्षेत्रातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य मात्र 62 हजार 8 कोटी रुपयांनी घसरत 20 लाख 41 हजार 822 कोटी रुपयांवर राहिले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्यसुद्धा 28,511 कोटींनी घटत 8 लाख 50 हजार 20 कोटी रुपयांवर राहिले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार मूल्यसुद्धा 23,427 कोटींनी घटत 7 लाख 70 हजार 149 कोटी रुपयांवर घसरले होते.