बेंगळूरच्या विकासासाठी 1 लाख 20 हजार कोटी : मुख्यमंत्री
बेंगळूर : बेंगळूरचा विकास करण्याचा पुढाकार सरकारने घेतला असून विकासासाठी 1.20 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. गांधीनगर विधानसभा मतदारसंघातील चिक्कपेठ येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या निधीतून नवीन बाह्या रिंग रोड, बोगदा, उड्डाणपूल, डबल-डेकर रस्त्यांचा विकास साधला जाणार आहे. भाजप सत्तेत असताना एकही नवीन रस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही. एकही खड्डा बुजविले गेले नाही. आता अस्तित्वात असलेले सर्व रस्ते काँग्रेसच्या काळात निर्माण केलेली आहेत. बेंगळूर हे वेगाने वाढणारे शहर असून शहराची लोकसंख्या वाढत आहे. या आव्हानासोबतच आम्ही बेंगळुरातील रस्त्यांच्या आधुनिकीकरण आणि विकासासाठी पुरेसा निधी देत आहोत, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. बेंगळूर मेट्रोसाठी 87 टक्के पैसे आम्ही देत आहोत. म्हणजेच, राज्यातील जनतेच्या 87 टक्के पैशातून मेट्रोला निधी दिला जात आहे. परंतु भाजप मेट्रो हा एक केंद्रीय प्रकल्प आहे असे सांगून खोटे बोलत आहे, असेही ते म्हणाले.