तामिळनाडूत नवजात बालकांसाठी 1 ग्रॅम सोन्याची अंगठी
मुख्यमंत्री विजय यांच्याकडून ‘गिफ्ट’ : योजनेसाठी 755.83 कोटींची तरतूद
वृत्तसंस्था/ मदुराई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपले निवडणुकीचे आश्वासन पूर्ण करत सोमवारी नवजात बालकांसाठी ‘थैमामन थंगा मोतिरम थिट्टम’ म्हणजेच ‘मामाकडून सोन्याची अंगठी’ ही योजना सुरू केली. मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयात या योजनेच्या शुभारंभावेळी, मुख्यमंत्र्यांनी नवजात बालकांना आपल्या हातात घेऊन पात्र मुलांना एक ग्रॅम वजनाच्या 22-कॅरेट सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले.
राज्य सरकारने या योजनेसाठी 755.83 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या पात्र नवजात बालकांना एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी प्रदान केली जाणार आहे. मातृत्वाचा सन्मान करणे, महिलांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि अधिकाधिक कुटुंबांना शासकीय आरोग्य सेवांशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही योजना मूलत: दिवंगत मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीदिनी 15 सप्टेंबर रोजी सुरू होणार होती. तथापि, मुख्यमंत्री विजय यांच्या लंडन दौऱ्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. सोमवारी मदुराईमध्ये याची औपचारिक अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ 22 जून 2026 पासून जन्मलेल्या मुलांना उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यासाठी एकूण 1.28 लाख अंगठ्या खरेदी करण्यात आल्या असून त्यापैकी 6,400 अंगठ्या मदुराई जिह्याला वाटप करण्यात आल्या आहेत. या अंगठ्या राज्यभरातील 107 रुग्णालयांमधील पात्र कुटुंबांना वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ तामिळनाडूचे कायम रहिवासी असलेले लाभार्थीच या योजनेसाठी पात्र असतील