6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.97 लाख कोटींची वाढ
सेन्सेक्सने रचला होता इतिहास : आयसीआयसीआय बँकेचे मूल्य वाढले
वृत्तसंस्था/ कोलकाता
आघाडीवरच्या 10 पैकी 6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 97 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले आहे.
सेन्सेक्सचा विक्रम
मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1653 अंकांनी म्हणजेच 1.99 टक्के इतका दमदार वाढला होता. शुक्रवारी मात्र सेन्सेक्स निर्देशांक जवळपास 1359 अंकांनी म्हणजेच 1.63 टक्के इतका वाढत 84 हजार 544 या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. दिवसभराच्या सत्रामध्ये त्यादिवशी सेन्सेक्स जवळपास 1509 अंकांनी वाढत 84 हजार 694 अंकांपर्यंत मजल मारली होती.
कोणत्या कंपन्यांचे मूल्य वाढले
आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 63, 359 कोटी रुपयांनी वाढत 9 लाख 44 हजार 226 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याचसोबत एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 58569 कोटी रुपयांनी वाढत 13 लाख 28 हजार 605 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दूरसंचार क्षेत्रातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 44319 कोटी रुपयांनी वाढत 9लाख 74 हजार 810 कोटी रुपयांवर पोहोचले होते. सर्व आघाडीवरच्या कंपन्यांमध्ये बाजार भांडवल मूल्यात सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 19384 कोटी रुपयांनी वाढत 20 लाख 11 हजार 544 कोटी रुपयांवर पोहचले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 10 हजार 725 कोटींनी वाढत 7 लाख 84 कोटी रुपयांवर तर आयटीसीचे बाजार भांडवल 1375 कोटींनी वाढत 6 लाख 43 हजार 907 कोटी रुपयांवर पोहोचले.
या कंपन्यांचे बाजार भांडवल घटले
वरील कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य वाढलेले असले तरी काही कंपन्यांचे बाजार भांडवल मात्र मागच्या आठवड्यात कमी झालेले पाहायला मिळाले. यामध्ये टीसीएस आणि इन्फोसिस यांचा समावेश होता. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार मूल्य 85 हजार 730 कोटींनी कमी होत 15 लाख 50 हजार 459 कोटी रुपयांवर तर इन्फोसिसचे बाजार मूल्य 15861 कोटींनी घटत 7 लाख 91 हजार 438 कोटी रुपयांवर राहिले होते. दुसरीकडे आरोग्य व इतर विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 14832 कोटींनी कमी होत 6 लाख 39 हजार 172 कोटी रुपयांवर खाली आले होते.
..33 हजार कोटीचीविदेशी गुंतवणूक
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये भारतीय शेअरबाजारात आतापर्यंत 33 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे. 20 सप्टेंबरपर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये 33 हजार 691 कोटी रुपये गुंतवले आहेत. अमेरिकेतील मुख्य बँक फेडरलने व्याजदरामध्ये 0.5 टक्के कपात मागच्या आठवड्यात केली आहे. सप्टेंबरमध्ये झालेली गुंतवणूक ही मागच्या मार्चनंतर सर्वात दुसरी मोठी गुंतवणूक असल्याचे पाहायला मिळाले आहे. मार्चमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 35 हजार 100 कोटी रुपये गुंतवले होते.