सप्टेंबरमध्ये 1.73 लाख कोटी जीएसटीचे संकलन
वार्षिक आधारावर 6.5 टक्क्यांची वाढ :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन केले आहे. वार्षिक आधारावर यात 6.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 1.62 लाख कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून प्राप्त केले होते. तर मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये 1.75 लाख कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले होते. जीएसटी परतावा जारी केल्यावर एकूण जीएसटी संकलन सप्टेंबर महिन्यात 4 टक्क्यांनी वाढून 1.53 लाख कोटी रुपये राहिले आहे.
जून महिन्यात जीएसटी संकलन 7.7 टक्क्यांनी वाढले होते. तर आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 1.86 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत सरासरी जीएसटी संकलनाचे प्रमाण कमी होत 1.77 लाख कोटी रुपये मासिक राहिले आहे.
तर दुसरीकडे 1.7 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक जीएसटी संकलन झालेला सप्टेंबर हा सलग सातवा महिना आहे. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये जीएसटी संकलन 10.87 लाख कोटी रुपये राहिले आहे. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत हे प्रमाण 9.5 टक्के आहे.
परताव्यात 31 टक्क्यांची वृद्धी
जीएसटी संकलन डाटानुसार सप्टेंबर महिन्यात एकूण सीजीएसटी संकलन 31,422 कोटी रुपये, एसजीएसटी संकलन 39,283 कोटी रुपये, आयजीएसटी वसुली 46,087 कोटी रुपये आणि अधिभारातून 11,059 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तर निव्वळ आयात महसूल 45,390 कोटी रुपये राहिला आहे. सप्टेंबर महिन्यात 20,458 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे.
मणिपूरच्या जीएसटी उत्पन्नात मोठी घट
राज्यांना प्राप्त होणाऱ्या जीएसटी उत्पन्नावर नजर टाकल्यास हरियाणाच्या महसूलात 24 टक्के, दिल्लीच्या 20 टक्के, महाराष्ट्राच्या महसुलात 5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तामिळनाडूचा महसूलही 5 टक्के तर कर्नाटकच्या जीएसटी महसुलात 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. उत्तरप्रदेशच्या जीएसटी महसुलात 3 टक्क्यांची भर पडली आहे. तर हिंसाप्रभावित मणिपूरच्या जीएसटी महसुलात 33 टक्क्यांची घट दिसून आली आहे.