म्युच्युअल फंडात 1.7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
2023 मधील गुंतवणूक : नियामक सेबीची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये म्युच्युअल फंडात एकंदर गुंतवणूक 1.7 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली पाहायला मिळाली. बाजारातील नियामक सेबीकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
समभागांच्या खरेदीत वाढ
म्युच्युअल फंडांकडून समभागांची खरेदी ही डिसेंबरमध्ये सलग पाचव्या महिन्यामध्ये सर्वोच्च स्तरावर राहिली होती. या माध्यमातून पाहता 2023 मध्ये एकूण खरेदी 1.7 लाख कोटी रुपयांची झाली आहे. 28 डिसेंबरपर्यंत म्युच्युअल फंडांनी 23 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पाहिली आहे. या आधीच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. डिसेंबरमध्ये इक्विटी बाजाराने गेल्या 17 महिन्यातील सर्वाधिक तेजी प्राप्त केली आहे.
निफ्टी 50 आणि सेन्सेक्स जवळपास आठ टक्के वाढले आहेत. ऑगस्ट 2023 पासून इक्विटी म्युच्युअल फंडात दर महिन्याला 18 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम गुंतवली गेली आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये पाहता गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये शुद्ध रूपामध्ये 69 हजार 836 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या आधीच्या चार महिन्यांमध्ये पाहता हीच गुंतवणूक निव्वळ 26000 कोटी रुपये इतकी होती.
सेन्सेक्स, निफ्टीतही राहिली तेजी
2022 वर्षात 1.82 लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक इक्विटीत करण्यात आली होती. 2023 वर्षाअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी अनुक्रमे 18 टक्के, 20 टक्के इतकी तेजी राखली होती. निफ्टी मिडकॅप 100 व निफ्टी स्मॉलकॅप 100 यांनी अनुक्रमे 46 टक्के, 55 टक्के इतकी तेजी राखली होती.