केबल ऑपरेटर असल्याचे सांगून वृद्धेची दीड तोळ्याची चेन लंपास
वडगावातील प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण
बेळगाव : आपण केबल ऑपरेटर आहोत, कुठे दुरुस्ती करायची आहे, अशी विचारणा करीत घरात शिरलेल्या एका भामट्याने वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेऊन पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी ढोर गल्ली, वडगाव येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. भामट्यांची करामत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. गुरुवारी सायंकाळी शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मंजुळा विष्णू श्रेयकर (वय 75) यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेण्यात आली आहे.
मंजुळा यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. भामट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ढोर गल्ली येथील घरात मंजुळा व हिराबाई या दोन वृद्ध महिला असतात. बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास मंजुळा यांच्या घरी दोघे भामटे आले. एकटा बाहेर उभा होता तर दुसरा घरात आला. आपण केबल ऑपरेटर आहोत, कुठे दुरुस्ती करायची आहे? अशी विचारणा केली. मंजुळा यांना नीट चालता येत नाही. तरीही त्याने त्यांचे हात पकडून त्यांना पहिल्या मजल्यावर नेले.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
थोडा वेळ केबलची पाहणी केल्याचा त्याने बहाणा केला. पायरीवरून उतरताना मंजुळा यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेऊन त्याने पलायन केले. या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वडगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ केवळ वृद्ध महिला असलेल्या घरात घुसून एका वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी पळविणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी करण्यात आली आहे.