Kolhapur : दोन दिवसात सव्वालाख भाविक अंबाबाई चरणी..!
भाविकांनी यात्रीनिवास तर वाहनांनी वाहनतळे हाऊसफुल्ल
कोल्हापूर : अवघ्या आठच दिवसांवर दीपावली येऊन ठेपली आहे. सर्वत्र खरेदीचा माहोलही तयार झाला आहे. गेली दोन दिवस मिळालेल्या शासकीय सुट्टीचे औचित्य साधून हजारो करवीरकर दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. अनेक जण खरेदी करत करत करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात जाताना दिसत होते.
या भाविकांच्या गर्दीत परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दीही मिसळून जात होती, खरेदी करणारे बहुतांश भाविक हे अंबाबाईचे मुखदर्शन करत तर परगावाहून आलेले भाविक हे दर्शन रांगेतून मंदिरात पहायला मिळाले. दरम्यान, गेल्या शनिवारी व रविवारी स्थानिक व परगावाच्या मिळून सब्बा लाखावर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे गेल्या शुक्रवारी रात्रीच हजारो भाविक कोल्हापुरात आले होते. रात्री अकरानंतर अंबाबाई मंदिर व परिसरातील यात्रीनिवास तर भाविकांनी अक्षरशः भरून गेले होते. असेच चित्र रविवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात पहायला मिळाले.
दुसरीकडे गेल्या शनिवारप्रमाणे रविवारीही सकाळी १० नंतर मोठ्या संख्येने भाविकांचे कोल्हापुरात येणे सुरु झाले होते. त्याच्या चारचाकी वाहनांनी बिंदू चौक व दसरा चौकासह अन्य वाहनतळ भरुन गेले होते.
गेल्या दोन दिवसात पासून भाविकांच्या वर्दळीमुळे अंबाबाई मंदिर व परिसर सतत गजबजून गेला होता. अनेकांनी रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून वाडीरत्नागिरीवरील जोतिबाचे दर्शन घेताना किल्ले पन्हाळगडालाही भेट दिली. अनेक भाविक स्टेशन रोडमार्गे खिद्रापुरातील कोपेश्वर व नृसिंहवाडीतील दत्तात्रयांचे दर्शनाला जाताना दिसत होते.