चोवीस तासांत जुने गोवे,पणजीत दीड इंच पाऊस
पणजी : गेल्या 24 तासांत गोव्यात सरासरी एक इंच पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस दीड इंच जुने गोवे आणि पणजी या ठिकाणी झाला. पावसाचा जोर थोडा कमी असल्यामुळे 12 जूनपर्यंत गोव्यात येलो अलर्ट राहील. यादरम्यान सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सरासरी एक इंच पाऊस पडला. यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक पाऊस आहे. या एक इंच पावसामुळे मोसमातील पाऊस आता जवळपास साडेपाच इंच झाला आहे. सरासरीपेक्षा तो 26 टक्के कमी आहे. पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. उद्यापर्यंत राज्यात येलो अलर्ट राहील. त्यानंतर पावसाचे प्रमाण आणखी कमी होईल असा अंदाज आहे. साधारणत: सोमवारनंतर पाऊस पुन्हा आक्रमक होईल. गेल्या 24 तासांमध्ये पेडणे एक इंच, मुरगाव एक इंच, धारबांदोडा अर्धा इंच, मडगाव अर्धा इंच, केपे एक इंच, जुने गोवे दीड इंच, पणजी दीड इंच, फोंडा पाऊण इंच व म्हापसा एक इंच, दाबोळी अर्धा इंच, सांगे व साखळी येथे तुरळक पावसाच्या सरी पडल्या.